
वन रूपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले यांना काही अज्ञात व्यक्तींनी धमकी दिली आहे. आपल्या जिवाला धोका असल्याचे ट्विट डॉ. घुले यांनी केल्याने चर्चेला उधाण आले असून अजून पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुंबईत आपण सुरक्षित नसून मी माझ्या कुटुंबीयांसह लवकरच कायमचे दिल्ली येथे स्थायिक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात वन रूपी क्लिनिकने ठाण्यासह अन्य महानगर पालिकांच्या कोविड सेंटरचे काम केले आहे. ठाणे रेल्वे स्थानकाला लागूनच वन रूपी क्लिनिक असून त्याचा आतापर्यंत अनेक गरजूंनी लाभ घेतला आहे. या क्लिनिकमध्ये डॉ. राहुल घुले हे स्वतः रुग्णांवर उपचार करतात. आपल्याला धमक्या येत असल्याचे ट्विट केल्यानंतर त्यांनी आपले अकाऊंटच बंद करून टाकले. ही धमकी कोणी दिली हे समजू शकले नाही.





























































