विमानतळावर बॉम्बच्या धमकीचा फोन; एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळावर बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱ्याला सहार पोलिसांनी पुद्दुचेरी येथून अटक केली. दीपक पारीख असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन दिवसांपूर्वी दुपारी पावणेचारच्या सुमारास विमानतळावरील कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये फोन आला. आंतरराष्ट्रीय किंवा आंतर्देशीय विमानतळावर बॉम्बस्फोटाची घटना घडेल. जी देशाच्या लोकशाहीला हेलावणारी असेल. बॉम्बस्फोटाची माहिती ही अज्ञात स्रोतांकडून मिळाली असल्याचे सांगितले. कनेक्ट सेंटरमधील अधिकाऱ्याला त्याचे नाव विचारले असता त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. बॉम्बस्फोटाच्या फोनची माहिती विमानतळ सुरक्षा अधिकारी, टर्मिनल मॅनेजर आणि सीआयएसएफला देण्यात आली. त्या धमकीच्या फोननंतर श्वानपथक विमानतळावर आले. बॉम्बस्फोटाची अफवा असल्याचे समोर आले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ-8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम, सहाय्यक आयुक्त श्रीराम कोरेगावकर यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.

तपासासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. फोन करणारा व्यक्ती ही पुद्दुचेरी येथे असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांचे पथक पुद्दुचेरी येथे गेले. तेथून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे. दीपक हा मूळचा पुद्दुचेरीचा रहिवासी असून त्याचे आयटी विषयात त्याने डिप्लोमा केला असून तो एका ठिकाणी नोकरी करतो. काही वर्षांपासून तो मानसिक आजराने त्रस्त आहे. दीपकला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते.

राग डोक्यात ठेवून केला धमकीचा फोन
मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱ्याला जुहू पोलिसांनी अटक केली. अशोक मुखिया असे त्याचे नाव आहे. शनिवारी रात्री अशोकला कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांनी चोप दिला होता. त्याचा राग डोक्यात ठेवून त्याने धमकीचा फोन केला. अशोक हा मूळचा बिहारचा रहिवासी असून तो महिन्याभरापूर्वी मुंबईत आला होता. आज पहाटेच्या सुमारास अशोकने पोलीस नियंत्रण कक्षात चार रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन केला. त्या फोनची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. अशोक हा विलेपार्ले परिसरात फिरत असल्याचे समजले. त्यानंतर आझाद मैदानचे आणि जुहू पोलिसांचे संयुक्त पथक केले. या पथकाने अशोकला विलेपार्ले परिसरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने दारूच्या नशेत तो फोन केल्याचे उघड झाले.