
परळ येथील टाटा रुग्णालयात सकाळी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली. ही बाब समजताच भोईवाडा पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन शोधमोहीम राबवली. अखेर हा धमकीचा ई-मेल खोडसाळपणातून पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात नेहमीप्रमाणे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची वर्दळ असताना रुग्णालयाच्या अधिकृत ई-मेलवर एक धमकीचा मेल आला. रुग्णालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. या ई-मेलची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेत तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन सखोल शोधमोहीम राबवली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे हा धमकीचा ई-मेल खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे टाटा रुग्णालयात यापूर्वीदेखील अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.




























































