
लातूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथून पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह 7 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना 23 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय व विश्वासनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे विवेकानंद चौकाच्या हद्दीतील घरफोडीमधील आरोपी अंबाजोगाई येथे आहेत. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बीड जिल्ह्यातीलच असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ अंबाजोगाई येथे रवाना झाले.
गुन्ह्यतील संशयित आरोपीचा शोध घेतला असता ते अंबाजोगाई ते परळी जाणाऱ्या रोडवरील शेपवाडी गावाजवळील आराध्या हॉटेलच्या पाठीमागे बसलेले असल्याचे समजले. पथकाने आराध्या हॉटेलच्या पाठीमागून तीनजणांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड (वय 29, रा. साठे नगर परळी वेस अंबाजोगाई), किशोर उर्फ पप्पू काशिनाथ जोगदंड (वय 39, रा. साठे नगर परळी वेस अंबाजोगाई), प्रवीण उर्फ डॉण्या चंद्रकांत माने (वय 31, रा. शेपवाडी ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्यांनी त्यांच्या आणखीन दोन साथीदारासह 10-15 दिवसांपूर्वी लातूर येथील औसा जाणाऱ्या रिंगरोडच्या डाव्या बाजूस असलेल्या एका कॉलनीमधील बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी काही रक्कम व मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 7 लाख 37 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत.



























































