गोविंद गगराणी खुन प्रकरणामधील तीन आरोपींना जन्मठेप; जालन्यातील अंबड सत्र न्यायालयाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रल्हाद सी. भगुरे यांनी आरोपी नाथसागर उर्फ तुकाराम रामनाथ जाधव, अरुण कानिफनाथ मोरे, आकाश उर्फ गोट्या अशोक घोडे (सर्व रा. अंबड) यांना गोविंद शिवप्रसाद गगराणी यांचा खून केल्याप्रकरणी दोष ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा शनिवारी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी माहिती अशी की, 27 ऑगस्ट 2017 रोजी अंबड येथील गोविंद शिवप्रसाद गगराणी यांची तीन आरोपींनी संगनमत करुन आय.टी.आय. कॉलेजच्यामागे बोलावून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. ती गोविंद याने नाकारली असता त्याला आरोपी नाथसागर उर्फ तुकाराम रामनाथ जाधव, अरुण कानिफनाथ मोरे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गोविंद गगराणी यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. आरोपी आकाश उर्फ गोट्या अशोक घोडे याने मोठा दगड उचलून गोविंद यांच्या डोक्यात मारुन तीन आरोपींनी त्यांचा खुन केला. त्यानंतर मृताजवळील पाकीट, घडी, अंगठी, मोबाईल काढून घेत त्यांचे प्रेत बाजुच्या खदानातील पाण्यात फेकून पुरावा नष्ट केला.

या प्रकरणी ओमप्रकाश राधाकिशन गगराणी यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपींविरोधात कलम 302, 201,120 व 384 भादंवि प्रमाणे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात एकुण 3 आरोपी होते. त्यापैकी आरोपी नाथसागर उर्फ तुकाराम रामनाथ जाधव, अरुण कानिफनाथ मोरे, आकाश उर्फ गोट्या अशोक घोडे यांना कलम 302 अन्वये दोषी ठरवत अजन्म कारावासाची शिक्षा आणि प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि तो न भरल्यास प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालय, जालना यांचे समोर पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, अंबड येथे उर्वरित पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात तक्रारदार ओमप्रकाश गगराणी, डॉ. शेख इम्रान उस्मान व तपासीक अंमलदार डी.के. शेळके यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील, सोमनाथ जी. लढ्ढा यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. जी.एस.मुदंडा, अ‍ॅड. कोठारी, अ‍ॅड. लोहाडे यांनी मुख्य सहकार्य केले व अंबड येथे प्रकरण हस्तांतरण झाल्यानंतर सेशन कोर्ट पैरवी अधिकारी यांनी मदत केली.