सचिन कुर्मी हत्याकांड, मुख्य आरोपी विजय कुलकर्णीसह तिघे मोकाट; राजकीय दबावापोटी अटक होईना

अजित पवार गटाचे भायखळा तालुकाप्रमुख सचिन ऊर्फ मुन्ना कुर्मी यांचे निर्घृण हत्याकांड होऊन आठ महिने लोटले तरी मुख्य आरोपी विजय ऊर्फ बुवा कुलकर्णी व त्याचे तीन साथीदार मोकाट फिरत आहेत. सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असल्यानेच कुलकर्णींवर कारवाई होत नाही. राजकीय दबावामुळे पोलीसही हतबल आहेत असा आरोप करत कुर्मी कुटुंबीयांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

4 ऑक्टोबरच्या रात्री घोडपदेव येथे सचिन कुर्मी यांची धारदार शस्त्रांनी असंख्य वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शिंदे गटाचा पदाधिकारी व समाजविघातक कृत्य करणारा दिलीप वागसकर याच्यासह सहा जणांना अटक केली; परंतु या हत्याकांडाला आठ महिने झाले तरी या गुह्याचा मुख्य आरोपी मास्टर माइंड विजय ऊर्फ बुवा कुलकर्णी याच्यावर हात टाकण्याची हिंमत अद्याप पोलिसांनी दाखवलेली नाही. विजय आणि त्याचे सहकारी उजळ माथ्याने मोकाट फिरत आहेत.

– आम्ही अनेकदा पोलिसांकडे न्यायाची भीक मागितली; पण अनिल काळे, विजय काकडे, प्रफुल्ल पाटकर, गोविंद यादव, दिलीप वागसकर आणि शेखर मुधोळकर या सहा जणांना बेडय़ा ठोकल्यानंतर पोलिसांचा तपास थंडावला. मुख्य आरोपींना पकडायला पोलीस तयारच होईनात. न्यायासाठी आम्ही उपोषण केले, पण आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे महेश कुर्मी यांनी सांगितले.

– विजय कुलकर्णी, दिलीप वागसकर व त्यांच्या टोळीने भायखळा परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. जुगार अड्डे, ड्रग्स, गुटखा विक्रीचे काम ही टोळी करत आहे. भायखळा पोलीस व गुन्हे शाखेला ही सर्व माहिती असूनही कारवाई होत नाही. राजकीय वरदहस्तामुळे ही टोळी सुसाट आहे. यामुळे तरुण पिढी बरबाद होत असून समाजाचे नुकसान होत आहे. याला सचिनची साथ मिळत नव्हती हेच त्यांना बोचत होते. अजून किती मुडदे पडल्यावर राजकीय पक्ष व पोलिसांना जाग येणार आहे? आम्ही प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहोत. आमचा अंत पाहू नका, असा संताप सचिन कुर्मी यांच्या पत्नीने व्यक्त केला आहे.

…म्हणून सचिन त्यांना खटकत होता

सचिनचे भायखळा परिसरात उत्तम सामाजिक कार्य होते. समाजविघातक कृत्यांना तो पाठीशी घालत नव्हता. शिवाय तसे करण्यात तो सहभागीदेखील होत नव्हता. त्याचे राजकीय व सामाजिक वजन वाढत असल्याने पुढे जाऊन तो आपल्याला डोईजड होईल, तो आपले गैरधंदे बंद पाडेल ही खुन्नस विजय कुलकर्णी व वागसकरच्या मस्तकात होती. सचिनचे स्वच्छ सामाजिक कार्य आरोपींना खटकत होते. यातूनच विजय कुलकर्णी याने त्याच्या गैरधंद्यात काम करणाऱयांना हाताशी धरून सचिनचा काटा काढला. अख्खा भायखळा जाणतो की, विजयनेच हे हत्याकांड घडवून आणले; पण तरी त्याला हात लावण्याची हिंमत पोलीस दाखवत नसल्याचे महेश कुर्मी यांचा आरोप आहे.

भाजपचे पाठबळ

विजय कुलकर्णी हा भाजपच्या अखिल भारतीय माथाडी कामगार संघाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. पक्षाच्या पाठबळावर तो मोकाट आहे. सर्व आरोपींविरोधात भक्कम पुरावे आहेत, पण राजकीय दबावामुळे कुलकर्णी व त्याचे साथीदार गुंड संदीप लोद, अमर चोरगे, शुभम वागसकर यांना पकडले जात नाही. या गुंडांकडून अजून किती गुन्हे झाल्यावर त्यांना शासन होणार, असा सवाल सचिन कुर्मी यांची पत्नी व मोठय़ा भावाने केला.