
पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी एका मसाला व्यापाऱयावर कोयत्याने हल्ला करण्याची घटना राशीन येथे नुकतीच घडली आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जखमी व्यापाऱयावर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप प्रल्हाद पानसरे (वय 24, रा. राशीन, ता. कर्जत) असे जखमी व्यापाऱयाचे नाव आहे. महेश दीपक माने, रोहन मच्छिंद्र माने, शाहरुख चाँद शेख (तिघेही रा. राशीन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संदीप पानसरे यांचा मसाल्याचा व्यवसाय आहे. 29 मे रोजी सायंकाळी पानसरे हे शुभम भागवत या आपल्या मित्राच्या कापड दुकानासमोर बसले होते. त्यावेळी रोहन माने तेथे आला. माने हा पानसरे यांच्या ओळखीचा असून, तो ‘मला दुकान चालवायचे आहे, कसे चालवायचे असते, ते सांग’ असे प्रश्न विचारू लागला. तेवढय़ात त्याचे दोन मित्र महेश माने, शाहरुख शेख हेही तेथे आले. महेशने पानसरे यांच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे पानसरे यांनी सांगितले. त्यामुळे तिघांनीही पानसरे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. ‘हा आपल्याला पैसे देत नाही, याला आता जिवंत सोडायचे नाही’ असे म्हणत महेश माने याने कोयत्याने पानसरे यांच्या डोक्यात वार केले. पुढचे वार चुकविण्यासाठी पानसरे यांनी दोन्ही हात मध्ये घातले. त्यामुळे तळहातावर मोठी दुखापत झाली. पानसरे खाली पडले असता, माने याने डाव्या मांडीवर वार केला. त्यानंतर तिघांनीही लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली.
शुभम रजपूत, सौरभ थोरात, शुभम भागवत आदींनी पानसरे यांची सुटका केली. मात्र, ‘आता वाचलास, परत भेटला तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन तिघेही तेथून फरार झाले. त्यानंतर पानसरे यांच्या मित्रांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांनी भिगवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांना आज अटक करण्यात आली आहे.



























































