गोहत्या प्रकरणी तीन आरोपी ताब्यात; इतर आरोपींचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

खेड धामणदेवी या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाजवळ जंगलाच्या परिसरात गोहत्येचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. मुंढे म्हणाले की, 25 जानेवारी रोजी तुषार शांताराम गोवळकर, अनिष आंब्रे, संकेत हुमणे, प्रशांत चाळके हे ग्रामस्थ परिसरात फिरत असताना त्यांना 5 जण स्कॉर्पिओ गाडीसह संशयास्पद हालचाली करताना दिसले. ग्रामस्थांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढला. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते सापडले नाहीत. ग्रामस्थांनी परीसराची पाहणी केली असता तेथे एक बैल व एक गाय बांधून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला कळवले. पोलिसांनी संशयितांचा आणि गाडीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. या घटनेबाबत तुषार गोवळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शमशुद्दीन इस्माईल खेरटकर ( 33 रा.खेर्डी मोहल्ला ता.चिपळूण), पांडुरंग जयराम कदम (वय 50, रा.आवाशी देऊळवाडी ता.खेड) संतोष लक्ष्मण गमरे ( 48, रा.आवाशी बौध्दवाडी ता.खेड) यांना अटक करण्यात आली आहे. यातील शमशुद्दीन हा गावोगावी फिरुन गुरे जमा करतो व ती गुरे पांडुरंग कदम व संतोष गमरे यांच्या गोठयात ठेवत असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली. शमशुद्दीनवर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत.

घटनास्थळी सापडलेला एक बैल वनिता आंब्रे (रा.शेल्डी खालचीवाडी, ता.खेड) यांच्या मालकीचा आहे. तो शमशुद्दीन याने वनिता यांच्याकडून विकत घेतला होता. याप्रकरणात आणखी काही आरोपी आहेत त्यांना लवकरच पकडू असा विश्वास डॉ.मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, बाजीराव पाटील, शिरीष सासने व इतर अधिकारी उपस्थित होते.

गोहत्येचा प्रयत्न होता

घटनास्थळी एक गाय आणि एक बैल बांधण्यात आला होता. त्या बैलाला भूल देण्यात आली होती. त्यामुळे तो निपचीत पडला होता. यावरून तिथे गोहत्येचा प्रयत्न होत होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गाय, बैल विकताना विकत घेणारा कशासाठी विकत घेत आहे याचा शोध घ्यावा असे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.