
सामना ऑनलाईन । वसई
साफसफाईसाठी सेफ्टी टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना पहाटे नालासोपाऱ्यात घडली. दरम्यान, सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याचा ठपका ठेवून बिल्डरसह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सुपरवायझरला ताब्यात घेतले आहे. हलगर्जीपणामुळेच या सफाई कामगारांचा मृत्यू झाला असून दोषींवर कारवाई केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
नालासोपाऱ्याच्या आनंद व्ह्यू अपार्टमेंटमधील शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी 5 कामगारांना बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. साडेबाराच्या दरम्यान प्रदीप सरवटे हा बारा फूट खोल टाकीत उतरला. मात्र आतील वायूमुळे त्याला त्रास होऊ लागला. त्याला वाचविण्यासाठी सुनील चावरिया आणि बिका बुंबुक सेफ्टी टँकमध्ये उतरले. तिघांकडून काहीच प्रत्युत्तर येत नसल्याने बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड केला. अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर त्या तिघांना बाहेर काढले. पण त्यांचा मृत्यू झाला होता.


























































