गोव्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू, एकूण मृतांचा आकडा 26 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात आज दिवसभरात कोविडमुळे तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 26 झाला आहे. नव्याने 174 रुग्ण सापडले असून 88 जण बरे होऊन घरी गेले असले तरी राज्यात 1 हजार 552 जण कोविडग्रस्त असून उपचार घेत असल्याने परिस्थिती अद्यापही गंभीरच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गोव्यात आतापर्यंत 4 हजार 27 रुग्ण सापडले असून त्यातील 2 हजार 449 जण बरे झाले आहेत. मात्र मृतांचा आकडा वाढत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. आज दिवसभरात तीन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये 65 वर्षीय महिला घोगळ-मडगाव येथील होती. त्याशिवाय बिर्ला-झुवारीनगर येथील अन्य एका 65 वर्षीय महीलेचा  गोमेकॉ मधून कोविड हॉस्पिटल मध्ये हलवताना मृत्यू झाला. खोर्ली-म्हापसा येथील 51 वर्षीय इसमाला काल मृतावस्थेत हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले होते. त्याचा कोविड अहवाल सकारात्मक आल्याने दिवसभरातील मृतांची संख्या 3 झाली.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेतू एप्प असलेल्यानाच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळेल असे आदेश काढल्याने कार्यालयात येणाऱ्या लोकांना त्याचा फटका बसला. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत त्यांनी आपली काम करायची असतील तर काय कराव,असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी त्यावर टिकेची झोड उठवली होती. गोव्यात विविध मार्गे येणाऱ्यामध्ये कोविडग्रस्त मिळू लागल्यामुळे गोव्याची चिंता वाढली आहे. रस्ता, रेल्वे आणि विमानमार्गे आलेले 140 जण कोविडग्रस्त आढळून आले आहेत.