ब्रिटनसह ३ देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून दिली मान्यता, इस्रायलने व्यक्त केला संताप

ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी याची घोषणा केली. ब्रिटनसह कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानेही पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. फ्रान्स लवकरच पॅलेस्टाईनला मान्यता देणार आहे. हिंदुस्थान आणि चीनसह जगातील १४० हून अधिक देशांनी आधीच पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. मात्र इस्रायलने या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता देणे म्हणजे जिहादी संघटना हमासला बक्षीस देण्यासारखे आहे, असे इस्रायलने म्हटले आहे.

ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, “हा निर्णय हमाससाठी विजय नाही. हमासला पॅलेस्टाईन सरकारमध्ये कोणतेही भविष्य नसावे. शांततापूर्ण भविष्यासाठी हमासने सर्व कैदी सोडले पाहिजेत.” ते म्हणाले की, सुरक्षित इस्रायल आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन यांच्यासोबत शांतता राखणे आवश्यक आहे. जुलै २०२५ मध्ये ब्रिटनने इस्रायलला हमासशी युद्ध थांबवण्याची सूचना दिली होती, अन्यथा पॅलेस्टाईनला मान्यता देणार असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, नुकतेच कॅनडाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा कॅनडा हा पहिला G7 देश बनला. ऑस्ट्रेलियानेही हा निर्णय घेतला असून, फ्रान्स लवकरच यात सामील होण्याची शक्यता आहे.