
घरांच्या बांधकामास बिल्डर विलंब लावत असल्यामुळे हक्काच्या घराचे स्वप्न बघणाऱया ग्राहकांमध्ये नेहमीच नाराजी दिसून येते. मात्र आयआयटी- चेन्नईच्या माजी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा आविष्कार दाखवत अवघ्या पाच दिवसांत थ्रीडी प्रिंटिंगचे घर बांधून दाखवले आहे. तेही सिमेंट, काँक्रिटचे! आयआयटीच्या कॅम्पसमध्ये हे 600 चौरस फुटांचे एकमजली घर उभे असून त्यात बेडरूम, हॉल, स्वयंपाकघर अशा सुविधा आहेत.
थ्रीडी प्रिंटिंग घराच्या बांधकामासाठी नेहमीच्या पद्धतीच्या तुलनेत 30 टक्के कमी खर्च झाला आहे. घराच्या संकल्पनेपासून डिझाईन आणि फिनिशिंगपर्यंत सारंच मेड इन इंडिया आहे. आदित्य व्ही.एस., विद्याशंकर सी. आणि परिवर्तन रेड्डी या आयआयटी-चेन्नईच्या माजी विद्यार्थांनी टिवास्टा मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन हे स्टार्टअप सुरू केलंय. त्याअंतर्गत थ्रीडी प्रिंटिंग घराची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांनी घराच्या वेगवेगळ्या भागांना आधी वर्कशॉपमध्ये प्रिंट केले. त्यानंतर व्रेनच्या मदतीने चेन्नई पॅम्पसमध्ये नेऊन जोडले. बांधकाम साहित्य म्हणून सिमेंट आणि क्रॉंक्रिटचे थर वापरण्यात आले. प्रिंटरसाठी आपण आपल्या आवडीचे डिझाईन देऊ शकतो तसेच बांधकाम साहित्यही वापरू शकतो.
प्रदूषण कमी होणार
टिवास्टाचे सीओओ विद्याशंकर यांनी सांगितले की, जर मोकळी जमीन मिळाली तर सोयीसुविधांनी युक्त असे एक हजार चौरस फुटांचे घर फक्त दोन ते अडीच आठवडय़ांत तयार करता येईल. या पद्धतीने जर मोठय़ा प्रमाणात घरे बांधली तर एक घर अवघ्या पाच दिवसांत उभे राहील. थ्रीडी प्रिंटिंग घरांच्या उभारणीमुळे प्रदूषणदेखील कमी होईल.





























































