महाराष्ट्र संघात नाशिकच्या तिघी

बीसीसीआयतर्फे घेण्यात येणाऱया 23 वर्षाखालील महिलांच्या टी-ट्वेन्टी सामन्यांसाठी महाराष्ट्र संघात नाशिकच्या ईश्वरी सावकार, रसिका शिंदे व साक्षी कानडी या तिघींची निवड करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या युवा महिला क्रिकेटपटू ईश्वरी व रसिका यांनी यापूर्वी महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ, तसेच 23 व 19 वर्षाखालील गटात महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. साक्षीनेही यापूर्वी टी-ट्वेन्टी सामन्यासाठी महाराष्ट्रातर्फे 23 वर्षाखालील गटात सहभाग नोंदवला होता. हे सामने 10 ते 21 डिसेंबर दरम्यान त्रिवेंद्रम येथे खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्र संघाचा 10 डिसेंबरला मणिपूर, 11ला हिमाचल प्रदेश, 13- तामिळनाडू, 15- सिक्कीम, 17- झारखंड, 19- विदर्भ व 21 डिसेंबरला नागालँड संघासोबत सामना होईल.