
सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ
तालूक्यातील बाकली येथे आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या पोलवर शॉर्टसर्कीटने तीन शेतकर्यांच्या घराला आग लागून या आगीत संसारपयोगी साहित्य, शेतीची अवजारे, जनावरांचा चारा असे ५० ते ६० हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. कोणतीही जिवीत हानी झाली नाही परंतु संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अभंग शिंदे, भानुदास शिंदे, गुणवंत शेळके अशी या शेतकर्यांची नावे असून तिघांचे मिळून १ लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकर्यांनी दै. सामनाला दिली. ऐन दुष्काळात या शेतकर्यांवर हे संकट आल्याने प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई देऊन मदत करावी, अशी मागणी नागरिकांडून केली जात आहे.
दीड तास झाल्यानंतरही अग्निशामक दल, महावितरणचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी समस्त गावकर्यांनी प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मंडळ अधिकारी व तलाठी यांना प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करण्यासाठी पाठवले असून त्यांचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया दै. सामनाला दिली.



























































