दोघा शाळकरी मुलांना वाचविताना तीन जवानांचा बुडून मृत्यू

नगरमधील अकोला तालुक्यात असलेल्या सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीच्या पात्रात दोन शाळकरी मुले बुडाली. या मुलांना वाचविण्यासाठी गेलेले तीन जवान बुडून मरण पावले. हे तिन्ही जवान राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे येथील कार्यालयात कार्यरत होते. बुडून मरण पावलेल्या तिघांमध्ये पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, पोलिस कर्मचारी राहुल गोपीचंद पावरा आणि वैभव सुनील वाघ यांचा समावेश आहे.

सुगाव बुद्रक येथे प्रवरा नदीच्या पात्रात 22 मेला दुपारच्या सुमारास शाळकरी मुले बुडाल्याची माहिती मिळाली. या मुलांना वाचविण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना बोलविले होते. जवान बोटीत बसून नदीपात्रात बुडालेल्या मुलांचा शोधा घेत होते. परंतु त्याच वेळी वादळी वारा सुटला आणि नदी पात्राच्या भोवऱयात आपत्ती प्रतिसाद दलाची बोट उलटली आणि हे तिघे जवान पाण्यात बुडाले.

पालकमंत्री विखे यांचा ताफा अडवून नागरिकांनी जाब विचारला

दुर्घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील हे घटनास्थळी भेट देण्यासाठी आले असता संतप्त तरुण व नागरिकांनी त्यांचा ताफा अडवून आजच्या घटनेतील प्रशासकीय हलगर्जीपणाबद्दल जाब विचारला.