विहिरीचे काम सुरू असताना क्रेनचा वायररोप तुटल्याने तिघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । अकोला

अकोले तालुक्यातील देवठाण गावच्या शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचे काम सुरू असताना सोमवारी दुपारच्या सुमारास अपघात झाल्याने तीन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनचा वायररोप अचानक तुटल्याने हा अपघात घडला.

विहिरीचे काम सुरू असताना क्रेनपासून तुटून अलग झालेला वायररोप विहिरीत पडल्याने यावर काम करीत असलेले तीन मजूरही विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत तीन मजुरांचा दुदैवी मृत्यू झाला. बाळासाहेब दत्तात्रय शेळके (वय 40) रा. देवठाण, तालुका अकोले, गणेश दत्तू कदम (वय 33) रा. हिवरगाव आंबरे, तालुका अकोले व नवनाथ गोविंद शिंदे (वय 40) रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर अशी मृतांची नावे आहे. अकोले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामे करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे करीत आहेत.