नांदेड : दोन वेगवेगळ्या घटनेत तिघे बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, दोन बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचा अक्षरक्ष बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत सोमवारी तिघे जण पाण्यात बुडाले. घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतर तिघांपैकी एकाचा मृतदेह हाती आला आहे, तर दोन जण अद्यापही बेपत्ता आहे. प्रशासनाकडून योग्य ती हालचाल होत नसल्याने पाण्यात बुडालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता या गावाजवळ बंडू बोनडारे आणि जयराम भुजबळ हे दोघे जण मोटारसायकलवर बसून गावी धानोराकडे निघाले होते. गावाजवळ असलेल्या ओढ्याला आलेल्या पुरात हे दोघे दुचाकीसह वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच त्यांचा शोध सुरू झाला. मात्र सोमवारी यात यश मिळाले नाही. मंगळवारी दुपारच्या सुमारास जयराम भूजबळ यांचा मृतदेह सापडला, तर बंडू बोनडारे अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या एका घटनेत किनवट तालुक्यात 20 वर्षीय सोहेल खान हा तरुण पैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेला असताना बुडाला. सोहेलचा अद्यापही शोध लागलेला नाही. बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नांदेडमधील यंत्रणा कमी पडल्याने नागपूरहून आपत्ती व्यवस्थापन दलाच्या एका दलाला पाचारण करण्यात येणार आहे. या पथकाद्वारे बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येणार आहे.