माऊंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम, तीन गिर्यारोहकांचा मृत्यू

37

सामना ऑनलाईन । काठमांडू

जगातलं सर्वोच्च पर्वत शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जाम झाल्याचं समोर येत आहे. एका गिर्यारोहकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमधून हे वास्तव उघड झालं आहे. एव्हरेस्टच्या क्रेझपायी अनेकजण गिर्यारोहण करत असून त्यामुळे पर्वत शिखरावर गिर्यारोहकांची गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून त्यातील दोघे जण हे हिंदुस्थानी आहेत.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, यंदा वसंत ऋतुतील एव्हरेस्ट चढाईसाठी 381 लोकांना नेपाळकडून परवाने देण्यात आले होते. एव्हरेस्टवर गिर्यारोहण करून तो सर करण्याची क्रेझ वाढत चालल्यामुळे एव्हरेस्टवर माणसांची गर्दी पाहायला मिळत आहे. अशीच गर्दी झाल्याने तीन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. कारण एव्हरेस्टवरच्या या ट्रॅफिकमुळे हे तीन गिर्यारोहक परतीचा प्रवास सुरू करू शकले नाहीत. तिथल्या प्रतिकूल वातावरणात 12 तासांहून अधिक काळ राहिल्याने ते आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. यात 52 वर्षीय कल्पना दास आणि 27 वर्षांचा तरुण गिर्यारोहक निहाल भगवान या दोन हिंदुस्थानींचा समावेश आहे.

यंदाचा मोसम चांगला नसल्याने एव्हरेस्ट सर करण्यासाठी अत्यंत कमी दिवस मिळाले होते. त्यामुळे गिर्यारोहकांनी तिथे पोहोचायला घाई केली आणि त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी झाल्याचं नेपाळ पर्यटन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या