कुस्तीत बाजी मारणार, ऑलिम्पिकच्या दृष्टीकोनातून 3 परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांतील हिंदुस्थानी मल्लांची पीछेहाट आणि हिंदुस्थानी प्रशिक्षकांना परदेशी स्पर्धांत येणारे अपयश पाहता आता हिंदुस्थानी कुस्ती महासंघाने आपल्या कुस्तीगिरांसाठी तीन परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणचे हुसेन करिमी, अमेरिकेचे अँड्र्यू कूक व जॉर्जियाचे टेमो कझाराशविली यांचा त्यात समावेश आहे. या प्रशिक्षकांशी एक वर्षाचा करार करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणाने (साई) बुधवारी या प्रशिक्षकांच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखविला. हुसेन हे हिंदुस्थानच्या फ्रीस्टाइल कुस्तीगीरांना मार्गदर्शन करतील तर कूक हे महिला कुस्तीगीरांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतील. कझाराशविली हे ग्रीको रोमन संघाचे प्रशिक्षक असतील. या तीन परदेशी प्रशिक्षकांना प्रथम 23 वर्षांखालील मुलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंना मार्गदर्शन करायचे आहे. ही स्पर्धा बुखारेस्ट येथे 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत होईल.

आम्ही प्रथमच इराण आणि अमेरिकेहून प्रशिक्षक नियुक्त केले आहेत. हिंदुस्थानी कुस्ती संघाला मार्गदर्शन करण्यात इराणला रस नव्हता पण या दोन देशातील कुस्ती महासंघांचे संबंध सुधारले आणि करिमी यांना नियुक्त करण्यात यश आले.अशी माहिती हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिली. करिमी हे इराणी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये होते. तिथे इराणला पाच पदकेही मिळाली. त्यात पुरुषांच्या गटात फ्रीस्टाइलमध्ये हसन याझदानीला मिळालेल्या सुवर्णपदकाचा समावेश होता.

रिओ ऑलिम्पिकमध्ये जॉर्जियाचे कझाराशविली हे उझबेकिस्तानच्या खेळाडूला मदत करताना आढळले होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अशा वादग्रस्त प्रशिक्षकाला नेमल्याबद्दल तोमर यांना विचारणा केल्यावर ते म्हणाले की, कझाराशविली यांनी हे आरोप नाकारले आहेत. भूतकाळातील चुकीनंतर ते चांगली कामगिरी करतील असा आम्हाला विश्वास आहे. ते उत्तम प्रशिक्षक आहेत आणि माजी विश्वविजेतेही आहेत. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा वेगळा पर्याय नव्हता.

तीन देशी प्रशिक्षक कायम राहणार
महिला कुस्तीगीरांनी अमेरिकेत सराव करताना चांगली प्रगती केली आहे. कूक यांच्यासारखा प्रशिक्षक मिळाल्यामुळे नक्कीच फायदा होणार आहे. खेळाडूंची गरज लक्षात घेता आणि परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे.परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली असली तरी जगमंदर सिंग (पुरुष फ्रीस्टाइल), कुलदीप सिंग मलिक (महिला प्रशिक्षक) आणि कुलदीप सिंग (ग्रीको रोमन) हे प्रशिक्षकही कायम राहणार आहेत, असेही तोमर यांनी स्पष्ट केले.