अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचा घाट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

एका 14 वर्षीय मुलीशी केलेले प्रेम आणि लग्नाची केलेली तयारी आता नवरदेव आणि त्याच्या आई-वडिलांच्या अंगलट आली आहे. या प्रकरणात 14 मे रोजी प्रेमवीरांचे लग्न निश्चित झाले असताना नांदेडच्या चौथ्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी नवरदेवाला 13 मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

नांदेड शहराच्या मध्यवर्ती भागात राहणार्‍या एक 24 वर्षीय युवक अक्षय जगदाळेने एका 14 वर्षीय बालिकेसोबत प्रेमसंबंध जुळविले. या प्रेमसंबंधात मुलाच्या घराच्या मंडळींनी मुलीच्या घरच्या मंडळींना सध्या सोयरीक करून मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न करू असे सांगितले. त्यानंतर 3 मार्च रोजी सोयरीक झाली. त्यानंतर लग्नाअगोदरच मुलगी मुलाच्या घरात त्याच्या पत्नीसारखीच राहू लागली. 14 मे ही लग्नाची तारीख ठरली आणि पत्रिका छापल्या. पण मुलगी चौदा वर्षांची असल्याने तिचे लग्न कायदेशीर होऊ शकत नाही, ही बाब समोर आली आणि मुलीच्या आईने वजिराबाद पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.

वजिराबाद पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. शनिवारी अक्षय जगदाळे,  त्याचे वडील विजयकुमार राघोबा (53) आणि कालिंदा जगदाळे (48) या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.