
गणपतीच्या पूजेसाठी फुले तोडण्यासाठी शेतात गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने विहिरीत पडून मृत्यू झाला असून, दोघे बचावले आहेत. कराड तालुक्यातील तासवडे येथे ही घटना घडली आहे. हिंदुराव मारुती शिंदे (वय 58), सीमा सदाशिव शिंदे (वय 48), शुभम सदाशिव शिंदे (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. नीलेश शंकर शिंदे (वय 25) व विनोद पांडुरंग शिंदे (वय 40) हे बचावले आहेत.
तासवडे येथे शिंदे वस्ती येथे घराजवळ लागून रघुनाथ जाधव यांची विहीर आहे. तेथे विहिरीवर मोटारीचे कनेक्शन आहे. येथे चार दिवसांपूर्वी नवीन लाईन घेण्यात आली आहे. सायंकाळी शिंदे कुटुंबातील तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. त्या दरम्यान त्यांना अचानक शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तेथील रहिवाशांनी विहिरीकडे धाव घेतली. तासाभरानंतर तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.



























































