महामार्गांवर तीन महिन्यांत तीन हजार 80 अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पाच वेगवेगळ्या महामार्गांवर गेल्या तीन महिन्यांत झालेल्या सहा हजारांहून अधिक अपघातांमध्ये तब्बल तीन हजार 80 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर तीन हजार 679 गंभीर जखमी झाले असून एक हजार 645 प्रवासी किरकोळ जखमी झाले. याशिवाय 472 किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या.

कोविडमुळे देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अपघातांचे प्रमाण जरी घटले असले तरी गेल्या तीन महिन्यांत मुंबई-पुणे, नवी मुंबई- कोल्हापूर, मुंबई-आग्रा, मुंबई- सुरत या महामार्गांवर जुन ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सहा हजार 760 अपघात झाले. त्यापैकी दोन हजार 847 अपघातांमध्ये तीन हजार 80 प्रवासी दगावले. दोन हजार 502 अपघातांमध्ये तीन हजार 679 नागरिक गंभीर जखमी झाले. तर 939 अपघातांत एक हजार 645 जण किरकोळ जखमी झाले. याशिवाय 472 किरकोळ अपघातांची नोंद झाली असून त्यात कोणी जखमीदेखील झाले नाही. जून महिन्यात एकूण 2215, जुलै – 2324 आणि ऑगस्टमध्ये 2221 अपघात झाले आहेत.

‘मृत्युंजय दूतां’मुळे 584 लोकांचे जीव वाचले

महामार्गांवर कुठे न कुठे अपघाताच्या घटना घडतच असतात. प्रत्येक वेळी अपघातग्रस्तांना झटपट मदत मिळेलच याची काही शाश्वती नसते. जर वेळीच मदतीचा हात मिळाला तर जखमींचे जीव वाचविता येतात. म्हणून महामार्ग पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांनी पाच ठिकाणांहून जाणाऱया महामार्गांवर ‘मृत्युंजयदूतां’ची नेमणूक केली. राज्यभरात पाच हजार 247 ‘मृत्युंजयदूत’ कार्यरत असून त्यांनी गेल्या नऊ महिन्यांत 584 नागरिकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण 335 अपघातांमध्ये झटपट मदत केली. 662 अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्यावर उपचार होऊ शकले. त्यामुळे साडेपाचशे व्यक्तींचे प्राण वाचविता आले असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.