बस पार्किंगसाठी महिना तीन हजारांची मागणी, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन बसेसवर नो पार्किगची दंडात्मक कारवाई न करण्याकरिता महिना तीन हजारांची मागणी करून ती रक्कम घेताना आझाद मैदान वाहतूक विभागाच्या अंमलदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच लाचेची मागणी करणाऱया प्रभारी पोलीस निरीक्षक शीतल मालटे यांनाही अटक करण्यात आली.

शंतनु (नाव बदललेले) यांचा सिद्धिविनायक ट्रव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन बसेसमधून एमएमआरडीएच्या कामगारांना चेंबूर ते कफ परेड असे ने-आण करण्याचे काम केले जाते. गेल्या दोन आठवडय़ांपासून त्या दोन्ही बसेसवर आझाद मैदान वाहतूक विभागाकडून वारंवार दंडात्मक करण्यात येत होती. त्यामुळे शंतनु हे अंमलदार तुषार चव्हाण यांना भेटले. तेव्हा चव्हाण यांनी निरीक्षक शीतल मालटे यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानुसार शंतनु हे मालटे यांना भेटले असता आझाद मैदानच्या हद्दीत गाडय़ा पार्क करण्यासाठी दरमहा चार हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. लाच द्यायची नसल्यामुळे शंतनु यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेऊन तक्रार दिली. शंतनु यांच्या तक्रारीची शहानिशा केली असता मालटे यांनी दोन गाडय़ांच्या पार्किंगसाठी महिना तीन हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी सापळा लावला असता शंतनु यांच्याकडून तीन हजार रुपये घेताना अंमलदार तुषार चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. मालटे यांच्या मागणीनुसार शंतनु यांच्याकडून चव्हाण यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट होताच शीतल मालटे यांनाही अटक करण्यात आली.

शीतल मालटे यांच्या कार्यालयात लिफाफ्यांमध्ये नोटा

मालटे यांनी मागणी केल्यानंतर शंतनु यांच्याकडून लाच घेताना तुषार चव्हाण यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शीतल मालटे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली तेव्हा कार्यालयात दहा वेगवेगळ्या लिफाफ्यांमध्ये तब्बल चार लाख 81 हजार रुपयांची रोकड सापडली.