सिंदखेडराजा तालुक्यातील विदुपा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू

754
sunk_drawn

सिंदखेडराजा तालुक्यातील चांगेफळ येथील विदुपा नदीवरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गंगाराम शांताराम भालेराव (वय 28,रा. चांगेफळ), ज्ञानेश्वर धोंडीराम भालेराव (वय 22,रा. चांगेफळ) आणि अविनाश सुरेश बांगर (रा. कानडी, तालुका मंठा) या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी गंगाराम भालेराव या युवकाचा मृतदेह सापडला आहे. तर इतर दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

चांगेफळ येथील पाच युवक सोमवारी सकाळी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. रविवारी पाऊस झाल्याने बंधाऱ्याची पाणीपातळी वाढली होती. पोहताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने एकजण बुडत होता. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दोन जणांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. बुडालेल्या तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून शोधमोहीम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या