अंडर वॉटर डेक व्ह्यूविंग गॅलरीतून पाहता येणार मगर-सुसरींचा थरार; पर्यटकांसाठी एप्रिल महिन्यात होणार खुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भायखळा येथील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात आता वाघांप्रमाणे मगर-सुसरीचा थरार जवळून अनुभवता येणार आहे. त्यासाठी ‘अंडर वॉटर डेक व्हुविंग’ गॅलरी तयार करण्यात येत असून एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात ती पर्यटकांसाठी खुली होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने 20 कोटींचा खर्च केला आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण पेंद्र आहे. उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी मुंबईसह देशविदेशातील पर्यटक येत असतात. दररोज 8 ते 10 हजार पर्यटक भेट देतात. तर शनिवार आणि रविवारी पर्यटकांची संख्या वाढून 25 ते 30 हजारांच्या पुढे जाते. त्यात उद्यान व प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वाघ, हरीण, तरस, अस्वल, हत्ती, अजगर आणि शेकडो प्रकारचे पक्षी, झाडे आहेत. 2017पासून सुरू करण्यात आलेल्या पेंग्विन कक्षामुळे पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यात आता वाघांप्रमाणे मगर आणि सुसरींना जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळावी, यासाठी विशेष काचेची गॅलरी तयार करण्यात येत आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात पाच मगरी आणि दोन सुसरी आहेत. आगामी काळात ओदिसा येथील नंदनकाकन आणि चेन्नईमधील क्रोकोडाईल बँककडून मगरी – सुसरी आणण्याचा विचार सुरू आहे.

1500 चौरस मीटर जागेत गॅलरी 

प्राणिसंग्रहालयात वाघांसाठी तयार केलेल्या काचेच्या ‘व्ह्यूविंग गॅलरी’प्रमाणे मगर आणि सुसरीसाठी दर्शनी भाग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या गॅलरीच्या माध्यमातून ‘अंडर वॉटर’ आणि ‘डेक व्ह्यूविंग’ पद्धतीने मगरी, सुसरी पाहता येणार आहेत. ही गॅलरी 1500 चौरस मीटर जागेत बनवण्यात येत आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात 5 मगर आणि 2 सुसरी असून त्यांना विविध प्रकारचे मासे, बफेलो बिफ, चिकन असे खाद्य देण्यात येते.