
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा गावातील येथील मधुकर बाबूराव गेडाम (52) यांच्यावर रविवारी संध्याकाळी वाघाने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले आहेत. रेशिम उद्योग कोसा प्रकल्प येथे देखरेखीच्या कामावर असताना संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतत होणारे वाघाचे हल्ले लक्षात घेता वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला वाघ मारण्याची परवानगी द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. मौजा हळदा गावापासून काही अंतरावर रेशीम कोसा प्रकल्प आहे. हा परिसर जंगलाच्या जवळ आहे. मधुकर गेडाम सहकाऱ्यांसोबत कचरा उचलण्याचे काम करत होते. गेडाम हे वाकून काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्लामुळे ते घाबरून ओरडायला लागले. त्यांचे सहकारी लगेच धावल्यामुळे वाघाने तेथून पळ काढला. मात्र गेडाम या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.





























































