
वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून वाघाचे कातडे आणि नखे मिळून 15 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शकीलजान महंमद शेख (रा. अप्पर डेप्पो) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
स्वारगेट तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सारसबाग परिसरात एकजण वाघाचे कातडे आणि नखे घेउन येत असल्याची माहिती पोलिस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शकीलजानला ताब्यात घेतले. त्याच्याकडीत पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये वाघाचे कातडे आणि नखे मिळून 15 लाखांचा ऐवज मिळून आला.
स्वारगेट पोलिसांनी वनअधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी वाघाच्या कातड्याची खात्री केल्यानंतर शकीलजानविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख एका गॅरेजमध्ये काम करतो. त्याला नाशिकमधील एकाने वाघाचे कातडे विक्री करण्यासाठी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, महेंद्र जगताप, सचिन कदम, पाटील, पंढरीनाथ शिंदे, मुंडे, विजय कुंभार, विजय खोमणे, सचिन दळवी, वैभव शीतकाल, अमित शिंदे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे शंकर गायकवाड यांच्या पथकाने केली.





























































