‘परिंदा भी पर नहीं मार सकता! उद्घाटनीय सामन्यासाठी कडेकोट बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल 2026 च्या उद्घाटनीय सामन्यापूर्वी एम. चिन्नास्वामी स्टेडियम परिसर अक्षरशः छावणीत बदलला असून ‘परिंदा भी पर नहीं मार सकता’ अशा पातळीचा कडेकोट बंदोबस्त उभारण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हायव्होल्टेज लढतीसाठी तब्बल 2000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता स्टेडियमबाहेर सात विशेष पथके उभी केली आहेत. गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी प्रत्येक स्तरावर कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

प्रेक्षकांची ये-जा सुरळीत राहावी यासाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या द्वारांची संख्या थेट 45 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय स्टेडियममध्ये अतिरिक्त अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाडय़ा आणि वैद्यकीय केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

तसेच स्टेडियमवर देखरेखीसाठी तब्बल 500 सीसीटीव्ही पॅमेरे बसवण्यात आले असून, पोलिसांची पथके रिअल-टाइममध्ये प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहेत. फक्त वैध तिकीटधारकांनाच प्रवेश, विनातिकीट चाहत्यांना बाहेरच रोखण्यासाठी विशेष तुकडय़ा तैनात आहेत. वाहतूक व्यवस्थाही कडक करण्यात आली असून, डिजिटल तिकीट तपासणी, मल्टी-लेव्हल सिक्युरिटी चेक आणि विशेष ड्रॉप-ऑफ झोन लागू करण्यात आले आहेत.