
ब्रम्हपुरी वन विभागाने नरभक्षक वाघिणीला रविवारी रोजी जेरबंद केले आहे. ही कारवाई मेळघाटातील गाभा वनक्षेत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आता मेळघाटात वाघिणीने केलेली दहशत संपुष्टात आली असून आदीवासींनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागात वास्तव्यास असलेल्या वाघिणीने या ठिकाणी हैदोस घातला होता. त्यामुळे या वाघिणला सुरक्षितेच्या दृष्टीने मेळघाटातील बिबामल वनक्षेत्रात सोडण्यात आले होते. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत याच वाघिणीने अनेक गुरा-ढोरांची शिकार केली होती. त्यानंतर 30 ऑगस्टच्या रात्री दादरा येथील शोभाराम चव्हाण यांच्यावर हल्ला करुन त्याची शिकार केली तर त्याचाच भाऊ वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झाला होता. या सोबतच केकदाखेडा येथील 7 वर्षाच्या बालिकेवर हल्ला केला मात्र ती सुदैवाने बचावली.
वाघिणीच्या दहशतीमुळे मेळघाटातील आदीवासी घाबरुन गेले होते. याबाबतची माहिती राज्य शासनापर्यंत वन विभागाने दिली. त्यामुळे या वाघिणीला जेरबंद करण्याचा आदेश वन विभागाने दिला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून वाघिणीला बेशुद्ध करणारे पथके तैनात करण्यात आली होती. दोन दिवस वाघिणीचा शोध सुरु असताना ती गोलाई गावाजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला बेशुद्ध करून तात्काळ पिंजर्यात बंद केले. त्यानंतर या वाघिणीला नागपूर येथे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे.

































































