
गेला काही काळ टिकटॉक नावाच्या अॅप्लिकेशनने व्हायरल जगात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. टिकटॉक व्हिडीओ बनवण्यासाठी बऱ्याचदा वाट्टेल ते प्रयोग केले जातात. या प्रयोगात अनेकांचा जीवही गेला आहे. असाच एका प्रकार तमिळनाडू येथे घडला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, तोंडात जिवंत मासा ठेवून टिकटॉक व्हिडीओ बनवण्याच्या प्रयत्नात एका 22 वर्षांच्या तरुणाचा जीव गेला आहे. तमिळनाडू येथील होसूर या गावचा हा तरुण तलावात मासे पकडायला गेला होता. मासे पकडत असताना त्याला जिवंत मासा गिळत असतानाचा टिकटॉक व्हिडीओ बनवण्याची कल्पना सुचली. त्याने व्हिडीओची कल्पना अंमलात आणली आणि जिवंत मासा गिळू लागला.
दुर्दैवाने या प्रयत्नात त्याच्या घशात मासा अडकला. त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्याच्या मित्रांनी त्याला पाठीवर झोपवून मासा काढायचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा त्रास कमी झाला नाही. त्याला ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण दारूच्या नशेत मासे पकडायला गेला होता. तो टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होता. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठीच त्याने हा प्रकार केला आणि त्यात तो मृत्युमुखी पडला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांना अटक केली आहे.
























































