प्रदूषणाची समस्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> टिळक उमाजी खाडे

भारतातील इतर प्रांतांत दिवे, फटाके व मिठाईपुरत्या मर्यादित असलेल्या दिवाळी या सणाला अनेक सांस्कृतिक संदर्भ आहेत. वसुबारस (गोवत्स द्वादशी), धनत्रयोदशी (धन्वंतरी पूजन), नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज असे सलग पाच दिवस चालणारा दिव्यांचा उत्सव सर्वार्थाने वेगळा आहे. पिढय़ा बदलल्या, आर्थिक चढउतार आले, पण दिवाळीचा उत्साह व आनंद यत्किंचितही कमी झाला नाही.

चार महिने शेतात राबून खरिपाचे पीक दिवाळीच्या सुमारास बळीराजाच्या हातात येते. पूर्वीच्या काळी घरासमोरील अंगण करण्याच्या कामाने दिवाळी आल्याची चाहूल लागायची. आता हे चित्र काहीसे दुर्मीळ झाले आहे. ‘दिवाळीचे दिवे भरायला पाऊस येणारच’ ही पूर्वापारपासूनची समजूत आजही खरी होत आहे. गेल्या काही वर्षांत ‘उठा, उठा दिवाळी आली, मोतीस्नानाची वेळ झाली’ ही ‘मोती’ साबणाची जाहिरात दिवाळी आल्याची वर्दी देत आहे. एरवी कामाच्या गडबडीमुळे बहिणीला न भेटणारा भाऊ कोणतीही सबब न सांगता भाऊबीजेला बहिणीला भेटतोच. दिवाळीत प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक हा तर वाचकांचा साहित्यिक फराळ. दिवाळी अंकांची ही शतक महोत्सवी परंपरा फक्त महाराष्ट्रानेच जपली आहे.

आनंदाचे निधान व उत्साहाला उधाण आणणाऱया या दिवाळसणाला फटाक्यांमुळे प्रदूषणाचे गालबोट लागले आहे. दिवाळी आणि फटाके यांचा तसा काहीच ऐतिहासिक, पौराणिक व सांस्कृतिक संदर्भ नाही. मग हे फटाके हवेतच कशाला? उलट या फटाक्यांमुळे दिवाळीच्या सुमारास हवेची गुणवत्ता कमालीची खालावते. कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जातात. या फटाक्यांमुळे काही ठिकाणी आगी लागतात, शारीरिक इजा होते, पैशांची राख होते. फटाक्यांच्या कारखान्यात अनेक बालमजूर काम करतात. फटाक्यांमुळे अर्भक, आजारी व वृद्ध माणसांना तसेच पशू-पक्ष्यांनाही विनाकारण त्रास होतो. दुर्दैवाची बाब म्हणजे फटाक्यांचे एवढे सर्व दुष्परिणाम माहीत असूनही फटाक्यांबाबत जनजागृती करणाऱयांना धर्मद्रोही ठरवले जाते हे अधिकच क्लेशकारक आहे. फटाके उडवण्याच्या कृतीला धार्मिक रंग देऊन आम्ही आमचा विवेक गहाण ठेवला आहे का?

दिल्लीत प्रदूषणाने हाहाकार माजवला आहे. आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर ही महानगरे आता त्याच पंक्तीत उभी आहेत. मग प्रदूषणावरील रामबाण उपाय करायचे सोडून तकलादू व हास्यास्पद उपाय आम्ही का योजावे? प्रदूषण ही मानवनिर्मित समस्या सोडवताना ‘मानव’च केंद्रस्थानी असायला हवा, तरच ही समस्या सुटेल.