
मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का आणि टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज तिलक वर्माने इंग्लंडमध्ये आपल्या फलंदाजीचा जलवा पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये तिलक वर्मा इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहे. नॉटिंगहॅमशायरविरुद्ध खेळताना त्याने 112 धावांची धमाकेदार खेळी केली.
तिलक वर्माने काऊंटी चॅम्पिचियनशीपमध्ये पहिल्या सामन्यापासून आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. हॅम्पशायरकडून खेळताना पदार्पणाच्या सामन्यातच त्याने एसेक्सविरुद्ध 100 धावा चोपून काढल्या होत्या. त्याची हीच लयबद्ध फलंदाजी नॉटिंगहॅमशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पाहायला मिळाली. तिलक वर्माने 256 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकार ठोकत 112 धावांची झंझावाती खेळी केली. तिलक वर्माच्या झुंझार खेळीमुळे हॅम्पशायरने 6 गड्यांच्या मोबदल्यात 367 धावांपर्यंत मजल मारली होती. दिवसाचा डाव संपवण्यापूर्वीच फ्रॅडी मॅककॅनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. तिलकने फलंदाजी करत असताना पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद अब्बासचाही खरपूस समाचार घेतला.
काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये तिलक वर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. तीन सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याने आतापर्यंत 78.75 च्या सरासरीने 315 धावा केल्या आहेत. पहिल्याच सामन्यात त्याने एक्सेसविरुद्ध 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने वॉर्सेस्टरशायरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात 47 धावांची खेळी केली होती. काऊंटी चॅम्पियनशीप 2025 मध्ये हॅम्पशायरकडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा तिलक वर्मा सहावा फलंदाज आहे.




























































