घरातून करीयर सजवा!

नेहमीपेक्षा वेगळं आणि नावीन्यपूर्ण काम केल्याचा आनंद मिळावा याकरिता इंटिरियर डिझाइन हा करिअरचा उत्तम पर्याय आहे. घर, कार्यालय, दवाखाना अशा विविध वास्तू सुंदर आणि नीटनेटक्या दिसण्यासाठी त्याचं डिझाइन करण्याचं काम इंटिरियर डिझायनर करतो. ही एक कला असून याच्याशी संबंधित कलाकाराला वास्तूविषयी ज्ञान असणे गरजेचे आहे. जेणेकरून तो छोटय़ाशा जागेलाही आकर्षक बनवू शकेल.

छोटय़ाशा घरात संपूर्ण कुटुंबाचे सामान मावेल, सुबक दिसेल अशा पद्धतीने रचणे हे काम फक्त तेच करू शकतात. या विषयात स्पेशलायझेशनही करता येते. ऑफिस डिझायनिंग, किचन डिझायनिंग, रूम्स डिझायनिंग, बिझनेस डिझायनिंग आणि होम डेकोर यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवू शकता. इंटिरियर डिझायनरचे काम खूपच आव्हानात्मक असते. एखादा प्रोजेक्ट हाती घेतल्यास ते काम संपूर्ण टीमच्या साहाय्याने पूर्ण करावे लागते. त्यासोबत ग्राहकाचे बजेट आणि आवड यांचाही विचार करावा लागतो. आज फक्त घरांच्या सजावटीसाठी नाही तर शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, हॉस्पिटल, एअरपोर्ट, हॉटेल अशा विविध ठिकाणी इंटिरियर डिझायनरने सुचविल्याप्रमाणे रंग, फर्निचर आणि डेकोरेशनची निवड केली जाते. शिवाय नियोजन, कन्स्ट्रक्शन, रिनोवेशन आणि डेकोरेशन या गोष्टीही लक्षात घेतल्या जातात.

संधी
लग्न, वाढदिवस अशा कार्यक्रमाप्रसंगीही इंटिरियर डिझायनरची आवश्यकता आता भासू लागली आहे. घर आणि व्यावसायिक प्रॉपर्टीमध्ये कमी जागेत जास्त सामान योग्य पद्धतीने ठेवता यावे याकरिता इंटिरियर डिझायनरची गरज असते. त्यासाठी करीअरच्या सुरुवातीला आर्किटेक्चर फर्म, बिल्डर फर्म, पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट, टाउैन प्लॅनिंग ब्युरो, हॉटेल, रिसॉर्ट, स्टुडिओ वर्क प्लॅनर कन्सल्टन्सीमध्ये काम करू शकता. स्वतंत्र व्यवसायही करता येतो.

आवश्यक गुण
क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञानाची योग्य जाण असणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच या क्षेत्रात दर्जेदार काम करता येऊ शकते. तसेच कल्पनाशक्तीही चांगली असायला हवी. तरच नव्या संकल्पना सुचू शकतील. z बाजारात सुरू असलेला नवा ट्रेंड माहीत असायला हवा. यासाठी सतत अपडेट राहायला हवे. z रिअल इस्टेट क्षेत्राचीही माहिती असायला हवी. कारण इमारत किंवा घर यासाठी कोणत्या प्रकारचे मटेरियल वापरले जाते. नवीन डिझाईन बाजारात आलंय. त्यामुळे ग्राहकांशी संवाद साधणे सोपे जाते.

शिक्षण आणि कोर्स
12वीनंतर डिप्लोमा, पदवी आणि सर्टिफिकेट कोर्ससाठी प्रवेश घेता येतो. पदवीनंतर इंटिरियर डिझायनरचा कोर्स करायचा असल्यास पीजी डिप्लोमा, पदवी आणि पदविका कोर्सही करता येतो. बॅचलर इन इंटिरियर डिझाइन, बीए इन इंटीरियर आर्किटेक्चर ऍण्ड डिझाइन, डिप्लोमा इन इंटिरियर स्पेस ऍण्ड फर्निचर डिझाइन, पीजी डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन असेही कोर्स करू शकता.

संस्था
एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, पुणे
इन्स्टिटय़ूट ऑफ इंटिरियर डिझायनर्स, नवी दिल्ली
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद

आपली प्रतिक्रिया द्या