
>> वंदना चौबळ
आज एकेकट्या राहणार्या आजी-आजोबांसाठी घरात मदतनीस ठेवणे गरजेचे झाले आहे. हा किंवा ही मदतनीसाची निवड कशी करावी?
आज अनेक आजी-आजोबा एकटे राहत असतात. एक तर मुलं परदेशात असतात, मुलांपासून विभक्त झालेले असतात किंवा आणखीही अनेक कारणे असू शकतात. अशावेळी त्यांना चोवीस तास सहायकाची गरज असते. हा सहायक निवडताना मात्र डोळ्यांत तेल घालून काळजी घ्यायला हवी. नोकरी-धंद्यामुळे अनेकजण घराबाहेर असतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठांची देखभाल करण्यासाठी मदतनीस ठेवले जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात मदतनीस ठेवण्याचे प्रमाणही सध्या वाढले आहे. पण हा मदतनीस विश्वासू आणि परिचयातीलच असावा. कारण आपल्या घरातील आजी आजोबांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची असल्याने तो नीट पारखूनच घेतला पाहिजे.
सर्वात आधी लक्षात ठेवायचं ते हे की, घरात चोवीस तासासाठी ठेवण्यात येणारा सहायक हा माहितीतला असावा. त्याच्याबद्दल आपल्याला इत्यंभूत माहिती असली पाहिजे. त्याने आधी काम केलेल्या ठिकाणी त्याची वर्तणूक कशी होती? किंवा आधी तो कोणत्या प्रकारचे काम करायचा याचीही चौकशी करून घ्या. केवळ आपल्याला खूप गरज आहे म्हणून हातघाईवर येऊन मदतनीस ठेवणे भविष्यात तुम्हाला महागात पडू शकते. त्यासाठी आधीच शहाणे व्हावे लागेल.
बर्याचदा घरी काम करत असलेल्या मदतनीसांना ज्येष्ठांकडून वाईट-अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांचा वारंवार घालून-पाडून बोलले जाते. अशावेळी संयम बाळगावा. त्यांना सतत दुखावण्यापेक्षा त्यांच्याशी आपुलकीने वागा. त्यांना सतत प्रोत्साहन द्यायला हवे. ते चुकले तरी वाईट बोलण्यापेक्षा ते पुन्हा तशी चुक करणार नाहीत अशा पद्धतीने प्रयत्न करावा. त्यांच्याशी कुंटुंबातील सदस्याप्रमाणेतच वागणूक दिली तर त्यांनाही तुमच्याविषयी आत्मियता वाटेल.
घरातील ज्येष्ठ व्यक्तींमुळेच आपण आहोत याची जाण मदतनीसानेही ठेवली पाहिजे. त्यामुळे या ज्येष्ठांचा सांभाळ करणे त्यांना सोपे जाईल. मदतनीसानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता मन लावून चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठांना तुम्ही जितके आपुलकीने वागवाल तितका त्यांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल.
हेही लक्षात ठेवा…
आपल्या घरात मदतनीस असले तर ते कुटुंबाचा भागच समजा. त्यांचे वाढदिवस, त्यांच्या जीवनातले आनंदाचे क्षण, सण त्यांच्यासोबत साजरे करायला हवेत. त्यांनाही त्यांचा दिवस त्यांच्या कुटुंबासोबत घालवण्याची संधी द्यायला विसरू नका.
घरातील ज्येष्ठ व्यक्ती ही जबाबदारी खरं तर आपलीच असते, पण काही घरगुती समस्या असतील तर किंवा मुलं परदेशात असल्यास मदतनीसांशिवाय पर्याय नसतो. घरात मदतनीस ठेवणे चुकीचे नाही. फक्त तो विश्वासातलाच असावा.
डोळे मिटून विश्वास नको
आजकाल कोणाचे मन कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एखाद्यावर कितपत विश्वास ठेवावा अगर ठेवू नये हे प्रत्येकाला कळायला हवे. आजी-आजोबा बर्याचदा त्यांचे मदतनीस कुटंबच मानतात. खरं तर ही भावना बरोबर असते. पण त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये. त्यांचे खाण्या-पिण्याचे लाड करा. पण कुठल्याही व्यवहारांमध्ये त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे चुकीचे आहे. शिवाय घरातील मौल्यवान वस्तू, कपाटाच्या किल्ल्या, पैशांचा व्यवहार शक्यतो त्यांच्यावर सोपवू नका. त्यांच्या हातात त्या सोपवणे कदाचित धोक्याचे असू शकते.
- घरात आजी-आजोबा दोघेच राहत असतील आणि त्यांनी घरात मदतनीस ठेवला असेल तर त्याची संपूर्ण माहिती त्याच्या फोटोसह जवळच्या पोलीस ठाण्यात देणे फार फार गरजेचे आहे. कारण भविष्यात दुदैवाने काही गैरप्रकार झाल्यास पोलिसांना तपासात अडथळा येणार नाही.
- मदतनीस रात्रंदिवस आपल्याच घरी राहणार असतात. त्यांचीच सोबत असते. त्यामुळे त्यांना सांभाळून घ्यावे. त्यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवावेत. कामाचे स्वरुप मदतनीसाला आधीच सांगावे. नंतर वादाचे प्रसंग नकोत.
- मदतनीस शक्यतो ब्युरोमधून घ्यावेत. यात पैसे थोडे जास्त जातात, पण मदतनीसांची जबाबदारी ब्युरोची राहाते. शिवाय त्यांचे पैसेही ठरलेले असतात.
- कोणतीही गोष्ट किंवा काम त्यांना समजावून सांगावे. आपल्या स्वत:च्या दिनचर्येला आणि वेळेला शिस्त असणे आपल्या दृष्टीने आणि मदतनीसांच्या दृष्टीनेही चांगले.
- त्यांना शिळे पदार्थ अजिबात देऊ नयेत. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जेवढ्यास तेवढे अन्न शिजवावे. म्हणजे ते उरण्याचा किंवा शिळे त्यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे सहाय्यकांना त्यांच्या चवीचे शिजवून घेण्यास सांगावे. घरी राहणार्या सहाय्यकास दिवसातले दोन तास त्यांचे म्हणून द्यावेत.




























































