
पाचक…पौष्टिक
जेवणानंतर पाचक मुखवास किंवा चटकदार पाचक गोळी तोंडात टाकण्यासारखे सुख नाही. आजी-आजोबांची तर ही फार आवडीची गोष्ट. आज बाहेर बाजारात जरी विविध पाचक गोळ्या आणि मुखवास मिळत असले तरी हे सोपे प्रकार आजी-आजोबा घरीही करू शकतात.
मसाला सुपारी
बडीशेपः 200 ग्रॅम, धनाडाळः 50 ग्रॅम, ओवाः 2 चमचे, लवंगः 10-12, वेलदोडाः 10-12, तीळः 2 चमचे, जेष्ठमध पूडः 50 ग्रॅम, शेंदेलोणः 1चमचा, पादेलोणः1 चमचा, सुके खोबरेः1/2 वाटी यातील सगळे साहित्य (जेष्ठमध पावडर, शेंदेलोण, पादेलोण सोडून) छान भाजून घ्यावे. हे सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरवर बारीक करून घ्यावे. यातच खसखस व बाळंतशेपा घातला की बाळंतिणीला उपयुक्त सुपारी तयार. चवही छान लागते. रोजच्या जेवणानंतर लहानमोठयांना चालणारी ही सुपारी.
आवळा सुपारी
प्रथम पाव किलो आवळे किसणीवर किसून घ्यावेत. नंतर एक आल्याचा मोठा तुकडा किसून घ्यावा. नंतर त्यात चवीनुसार मीठ, चमचाभर लिंबाचा रस, एक चमचा जिरेपूड एकत्र करुन उन्हात वाळवावे. आवळा अतिशय औषधी आणि गुणकारी, पचनास उपयुक्त आणि उपासाला चालणारा.
आमसूल-जिरा गोळी
20-25 आमसुलं पाण्यात भिजवून घ्यावीत. नंतर आमसूलं, चवीनुसार मीठ, एक चमचा जीरे, एक चमचा साखर हे सर्व एकत्र वाटून घ्यावे. थोडे चिकट झाल्यावर काढून हातावर गोळ्या कराव्यात. एक-दोन दिवस उन्हात वाळवून पिठीसाखरेत घोळवून ठेवाव्यात. ही जिरा गोळी लहान मुलांबरोबर ज्येष्ठांमध्येही प्रसिद्ध आहे.
जवसाचे पाचक
1 वाटी जवस, 1 वाटी बडीशेप खमंग भाजून घ्यावीत. त्यानंतर 1 चमचा खसखस, 1/4 वाटी तीळ मंद आचेवर छान गुलाबी भाजावेत. 1 चमचा ओवा भाजावा. सर्व साहित्य एकत्र करून त्यात अर्धा चमचा सैंधव व 1 चमचा जेष्ठमध पूड मिसळावे आणि बरणीत भरावे. ही सुपारी अशीच चावून खायला चांगली. बारीक पूड करायची गरज नाही.
पोषक मुखवास
एका बाऊलमध्ये अर्धा कप अळशी घ्यायची, त्यानंतर 1/2 कप बडीशेप, 1/2 कप धण्याची डाळ, 1/2 कप ओवा, 1/2 कप सफेत तीळ, 1/2 कप मगज बीज, प्रत्येकी वेगवेगळ्या बाऊलमध्ये काढून घेणे. आता प्रत्येक जिन्नसाला थोडी हळद, थोडे मीठ व थोडा लिंबाचा रस घालून चांगले एकजीव करुन झाकून 1 तास बाजूला ठेवून देणे. एक तासानंतर गॅस वर एक पॅन ठेवून प्रत्येक जिन्नस चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे. सर्व एकत्र करून थंड झाल्यावर एका बरणीत भरून ठेवावे. दुपारच्या व रात्रीच्या जेवणानंतर घरातील प्रत्येकाने 1 चमचा हा मुखवास खाणे.
जवस आणि बडीशेप
एका भांडय़ात पाव चमचा सैंधव मीठ, पाव चमचा पादेलोण मीठ, लिंबू रस एकत्र करून घ्यावे. या मिश्रणात 1 वाटी जवस टाकून चांगले हलवून एकत्र करून घ्यावे. काहीवेळ तसेच ठेवावे. त्यानंतर अर्धी वाटी बडीशेप, पाव वाटी धनाडाळ, अर्धी वाटी तीळ, व 1 वाटी जवस वेगवेगळे मंद आचेवर चांगले भाजून घ्यावे आमि एकत्र करावे.
जलजिराच्या गोळ्या
एक चमचा काळी मिरी, 100 ग्रॅम वेलची, 50 ग्रॅम दालचिनी, भाजून पावडर करून घेणे. 1/2चमचा काळे मीठ, तीन चमचे आमचूर पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1/2 चमचा हिंग, चवीनुसार मी’, 5 चमचे पिठीसाखर हे सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा.
टेस्टी चूर्ण
एका बाऊलमध्ये पाच टेबल स्पून आमचूर पावडर, 5 टेबल स्पून भाजलेले जिरे पावडर, 1/2 टेबलस्पून काळीमिरी पावडर, 1 टेबल स्पून सुपारी स्पेशल मसाला, 1/2 टेबल स्पून हिंग, 3 टेबल स्पून काळे मीठ, चवीनुसार मीठ, 7 टेबल स्पून पिठी साखर घ्यावे. वरील सर्व पदार्थ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करावे. ते चूर्ण जेवणानंतर खावे.

























































