
सोशल मीडिया हे आज प्रचाराचे आणि प्रसाराचे सर्वात वेगवान साधन आहे. राज्यात सध्या 13 कोटी लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॉटस्अॅप असून 6 कोटींहून अधिक लोक फेसबुक वापरत आहेत, तर साडेतीन कोटी ट्विटरचे युझर्स आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ध्येयधोरणे आणि केलेली कामे घराघरात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे सांगत युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या वापराबाबत टिप्स दिल्या.
आठ हजार डीजी शाखा समन्वयक नेमणार
शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहोचावे म्हणून लवकरच राज्यात आठ हजार डीजी शाखा समन्वयक (डिजिटल) नेमणार आहोत. ते पक्षाचा विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतील, असे दुर्गे म्हणाले.
– ‘प्रवास आपल्या शिवसेनेचा’ या फेसबुक आकाऊंटवरून आपण आपली कामे लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी, शिवसैनिकांनी सदरची पोस्ट आपल्या अकाऊंटवरून पुढे पाठवावी.
– पदाधिकाऱयांनी पक्षाकडून आणि स्वतःकडून केल्या जाणाऱया कामाच्या पोस्ट नियमितपणे टाकाव्यात. त्यामध्ये खंड पडू देऊ नये. आपल्या पोस्टमध्ये सातत्य असेल तर फॉलोअर्स वाढतात.
– आपण केलेल्या पोस्टवर येणाऱया कमेंट्सच्या प्रोफाईलवर नजर ठेवा. कारण अनेक कमेंट देशाबाहेरून येतात. त्यामुळे त्याला रिप्लाय देण्यात आपला वेळ आणि ताकद वाया घालवू नका कारण ती पेड अकाऊंट असतात.
– आपल्या पदाला अनुसरून पक्षाची भूमिका सोशल मीडियावर मांडा.
– आपण राहत असलेल्या परिसरात अनेक प्रभाव पाडणारे तरुण (इन्फ्लूएंझर) असतात. त्यांच्याशी जवळीक साधून आपल्या पक्षाची ध्येयधोरणे त्यांना समजावून सांगा.
– शिवसेनेची अधिकृत पोस्ट मतदारांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पक्षाची अधिकृत पोस्ट आपला मित्रपरिवार आणि सोसायटीच्या ग्रुपमध्ये, नातेवाईकांना पाठवावी.
– राज्यात सध्या निवडणुका होत नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र कोल्ड वॉर सुरू आहे. त्यासाठी विरोधकांकडून कोटय़वधी रुपये सोशल मीडियावर खर्च केले जात आहेत. मात्र आजही आपले अनेक पदाधिकारी सोशल मीडियापासून दूर आहेत. त्यांनी सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले.

























































