दरोड्यातील आरोपींचा टिपू श्वानाने काढला माग, सात आरोपींना ठोकल्या बेड्या

टोकी गावातील शेतवस्तीवरील दोन भावांच्या घरांवर मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील टिपू श्वानाने दरोडेखोरांचा सिंधी शिरसगावपर्यंत माग काढला… आणि पोलिसांनी या दरोड्यातील सात आरोपींना बेड्या ठोकल्या.

गंगापूर तालुक्यातील टोकी येथील कारभारी बाबुराव शेजवळ (४५) व भीमराव बाबुराव शेजवळ या दोन भावांच्या गट नंबर ९ मधील शेतवस्तीवर मंगळवारी रात्री १ वाजता ८ ते १० दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या दरोडेखोरांनी शेजवळ यांची आई कडुबाई, मुलगा आदेश व त्याचे वडील कारभारी शेजवळ यांना मारहाण केली होती. तसेच कडुबाई तसेच कारभारी शेजवळ यांची पत्नी वंदना यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पहाटे पाच वाजता छावणीतील श्वानपथकाला पाचारण केले होते. या पथकातील टिपू श्वानाने या दरोडेखोरांचा पाच किलोमीटर असलेल्या सिंधी शिरसगावपर्यंत माग काढला होता. या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना टिपूने दाखविलेले घर बंद होते. पोलिसांनी या घराच्या मालकाचा शोध घेऊन या दरोड्यातील आरोपी अर्जुन चंद्रकांत काळे, अजय मुकेश काळे, आकाश येल्लाप्पा काळे, विशाल बल्या भोसले, रवि जगताप काळे, शक्तिमान वसंत काळे, विक्की ठकसेन काळे यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली.

दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी दिली.