…आणि टायटॅनिक बुडाली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

टायटॅनिक बोट 10 एप्रिल 1912ला 2223 प्रवासी घेऊन न्यूयॉर्कच्या दिशेने निघाली. 14 एप्रिलच्या रात्री तिची उजवी बाजू एका भीमकाय हिमगर्भावर वेगात आपटली. तिचं डिझाइन असं होतं की, तिच्या सोळा कंपार्टमेंटपैकी चार कंपार्टमेंट पाण्याने भरले तरी ती तरंगणार होती. तिच्या दुर्दैवाने तिचे पाच कंपार्टमेंट पाण्याने भरले आणि अवघ्या तीन तासांत ती बोट बुडाली. एक हजार पाचशे सतरा प्रवासी मृत्यू पावले. जवळपास अमरत्वाचा वर मिळालेली बोट पदार्पणातच बुडाली. बुडताना बोटीचे दोन भाग होऊन बोट बुडाली असं दृश्य दिसलं.

मृत्यू जास्त झाले त्याचं एक कारण दिलं जातं ते म्हणजे लाइफबोटी खूपच कमी होत्या. त्याची क्षमता फक्त 1,178 माणसांची होती. त्या भयावह वातावरणात आणि किंकाळय़ांमध्ये त्या लाइफबोटी पूर्ण भरल्यासुद्धा गेल्या नाहीत. काहींनी समुद्रात उडी मारली, काही समुद्रात पडले. त्यामुळे काही फक्त गारठून किंवा बर्फ होऊन मेले.

टायटॅनिक बुडत असताना कॅरपाथिया नावाची बोट प्रवाशांना वाचवायला प्रथम पोहोचली. तिने 713 प्रवासी आणि काही खलाशांना वाचवले. ती बोट निघाली होती न्यूयॉर्कहून मेडिटेरियनला म्हणजे युरोपात. दिवसाचे काम संपवून त्या बोटीचा कॅप्टन आर्थर रॉसट्रॉन आपल्या केबिनमध्ये विसावत होता. इतक्यात त्याचा वायरलेस ऑपरेटर कॅप्टनच्या रूममध्ये धावत आला आणि टायटॅनिककडून मदतीचे सिग्नल्स येतायत असं त्यानं सांगितले. कॅप्टनने आपली बोट चक्क उलटी वळवली. पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी त्यांनी पहिली लाइफबोट पाहिली. त्यातली पहिली प्रवासी होती एलिझाबेथ ऍलन. तिने कॅरपाथियाच्या कॅप्टनला सांगितलं की, टायटॅनिक बोट बुडतेय. पुढे चार तासांत त्यांना वीस लाइफबोटी सापडल्या आणि मग ती बोट युरोपकडे न जाता परत न्यूयॉर्ककडे वळवली गेली.

कॅरपाथिया बोट वाचवलेल्या प्रवाशांना घेऊन 18 एप्रिलला न्यूयॉर्कला पोहोचली. तीस हजार माणसं आपल्या मित्र, नातेवाईकांसाठी जमली होती. कोण जगलं, कोण मेलं याचा हिशेब हळूहळू होत होता. वाचलेले प्रवासी धक्क्यातून सावरलेले नव्हते. बरेच जखमी होते. ती गर्दी पाहून काही प्रवासी बोटीतून उतरायलाही घाबरत होते. बोटीबाहेर काही ठिकाणी आनंदाश्रू वाहत होते, तर काही ठिकाणी फक्त दुःखाश्रू. ज्यांना आपले मित्र, नातेवाईक दिसले नाहीत त्यांनी हंबरडा फोडला. डोरेमी गिल्सन नावाची हॉलीवूडची नटी टायटॅनिकवर होती. ती आईबरोबर युरोपमध्ये ‘हॉलिडे’साठी गेली होती. ती वाचली. त्यानंतर तिने अपघातावरच्या एका सिनेमात कामसुद्धा केलं. तिने घटनेचे वर्णन करताना सांगितले,‘‘समुद्रात बुडणाऱया माणसांचा आक्रोश अजून माझ्या कानात घुमतोय. ती बुडणारी माणसं पाहून त्यांचे नातेवाईक वेडेपिसे होऊन आक्रोश करत होते.’’

टायटॅनिकच्या अनेक हृदयद्रावक आणि काही अचंबित करणाऱया कथा आहेत. टायटॅनिकच्या अपघातातून वाचवलेली शेवटची स्त्र्ााr वयाच्या 98व्या वर्षी 31 मे 2009 रोजी हे जग सोडून गेली. तिचं नाव ‘मिस मिल्विना डीन’. ती आणि तिचा भाऊ वाचले. ती त्यावेळी फक्त नऊ आठवडय़ांची होती. तिला एका पोस्टबॅगेत घालून लाइफबोटवर पाठवण्यात आले. एका मुलाखतकाराने तिला गमतीत विचारलं, ‘‘बोट बुडतानाचं दृश्य आठवतं का?’’ ती हसत म्हणाली, ‘‘नाही, पोस्टबॅगेच्या बाहेर मी पाहू शकले नाही.’’

एक अशी घटना घडली की, हरवलेल्या मुलाचे चित्रपट काढणाऱया मनमोहन देसाईलासुद्धा एक नवीन कथा देऊन गेली असती. एका फ्रेंच स्त्र्ााrची दोन मुलं मायकेल आणि एडमंड टायटॅनिकवर होती. तिचा आणि तिच्या नवऱयाचा घटस्फोट झालेला होता. नवऱयाने काय केलं असेल? त्या मुलांना पळवलं आणि तो आपल्याबरोबर युनायटेड स्टेट्सला घेऊन निघाला होता. बोट बुडाल्यावर तो मेला, ती मुलं वाचली. फ्रेंच वर्तमानपत्रात एकदा त्याचे फोटो छापून आले. ते त्यांच्या आईने ओळखले. ते फोटो कशासंबंधात आले असतील, तर टायटॅनिकच्या अनेक कहाण्या त्यावेळी विविध वर्तमानपत्रांत छापून येत असत. त्यात या दोन पोरक्या मुलांची कहाणी छापून आली. ती तिने वाचली. तिला लक्षात आलं की, ही आपलीच मुलं आहेत. कथेचा शेवट अचानक गोड झाला. ज्या मृत प्रवाशांची प्रेते सापडली त्यांना पुरण्यासाठी टायटॅनिक तयार करणाऱया कंपनीने जागा विकत घेतली. त्यातले 121 प्रवासी हे प्रोटेस्टंट ख्रिस्ती होते. त्यांना प्रोटेस्टंट धर्माच्या स्मशानात पुरलं. कॅथलिक ख्रिश्चन प्रेते कॅथलिक स्मशानभूमीत पाठवली गेली. दहा प्रेतांवर ज्यूंच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

तुमच्या ओठांवर प्रश्न आला असेल की, कॅप्टनचं काय झालं? सर्वसाधारणपणे बुडणाऱया बोटीचा कॅप्टन बोटीबरोबर जलसमाधी घेतो. टायटॅनिकचा कॅप्टन होता स्मिथ! अनेक जण वेगवेगळय़ा कहाण्या सांगत होते. काही जण म्हणाले की, त्याने समुद्राच्या बर्फाळलेल्या पाण्यात उडी घेतली. काही जण म्हणाले, त्याने स्वतःला गोळी मारून घेतली. एक गोष्ट खरी होती. त्याने एका मुलाला वाचवलं. त्याला लाइफबोटीत बसवलं. स्वतः मात्र लाइफबोटीत बसायला नकार दिला. टायटॅनिकबरोबर त्यानेसुद्धा जगाचा निरोप घेतला. नेव्हल जगात त्याला हिरोचं मरण म्हणतात.

एवढय़ा मोठय़ा अपघातानंतर चौकशी तर होणारच होती. चौकशीअंती काही निष्कर्ष काढण्यात आले. त्यातलं सर्वात महत्त्वाचं होतं की, बोटीवर पुरेशा लाइफबोटी नव्हत्या. काही तर अर्धवट भरलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आल्या. दुसरं म्हणजे तिसऱया दर्जाच्या प्रवाशांना तर वॉर्निंगच मिळाली नाही. त्यामुळे तिसऱया दर्जाचे प्रवासी जास्त मेले आणि कॅलिफोर्नियन नावाची बोट जवळ असूनही मदतीला आली नाही.
बेलफास्टच्या सिटी हॉलसमोर टायटॅनिकच्या मृत प्रवाशांचं एक स्मारक आहे. टायटॅनिक म्युझियम पाहिल्यावर एक मोठं समर्थ स्वप्न एका छोटय़ा चुकीने दुःस्वप्न होतं हे दिसलं.