टिटवाळ्यात ‘ब्लॅक स्पॉट’ची दहशत, वाजपेयी चौक-बल्याणी मार्गावर खोल खड्ड्याचा धोका

टिटवाळा शहरातील वाजपेयी चौक ते बल्याणी मार्गावर एक मोठा ‘ब्लॅक स्पॉट’ वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरला आहे. या मार्गावर डांबरी रस्ता खचून मोठा खड्डा पडला असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच हा खड्डा पार करावा लागत आहे. वाहनचालकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने माती भरून डांबराचा पातळ थर दिला, परंतु अवकाळीच्या तडाख्याने ही दुरुस्ती फोल ठरली आणि खड्डा पुन्हा उघडा पडल्याने तो वाहनचालकांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे.

वाजपेयी चौक ते बल्याणी मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून डांबर वितळून मोठा खड्डा पडला आहे. एका दुचाकीस्वाराचा याच ठिकाणी मोठा अपघात झाला, परंतु सुदैवाने तो बचावला. दुचाकीस्वार आणि चारचाकी स्वारांसाठी हा खड्ड्याचा ब्लॅक स्पॉट जीवघेणा ठरू लागला आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर हा खड्डा बुजवण्याचा थातूरमातूर फार्स करण्यात आला. या खड्यात माती भरण्यात आली आणि त्यावर डांबराचे पातळ थर टाकण्यात आला, परंतु महापालिकेचे हे पाप अवकाळी पावसाने उघड्यावर आणले आणि काही तासातच हा भलामोठा खड्डा पुन्हा उघडा पडला.

अधिकारी म्हणतात, गळतीमुळे खड्डा भरला नाही
याबाबत विचारणा केली असता महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने ‘पाइपलाइन गळतीमुळे हा खड्डा भरता आला नाही’ असा अजब खुलासा केला. एक जीवघेणा खड्डा महापालिकेला भरता येत नसेल तर शहरातले असंख्य खड्डे कसे भरणार, असा संतप्त सवाल टिटवाळावासीयांनी केला आहे.