टिवल्या-बावल्या – आनंदाचा ठेवा हरपला

>> शिरीष कणेकर

सकाळीच एक फोन आला. आमच्या ग्रुपमधला सुभाष गांगुली गेला होता. माझ्याबाबतीत असा फोन जाण्याचे दिवस कितीसे लांब होते? माझ्या छातीत चर्रर् झाले.

काही न काही कारणानं आमचा ग्रुप बरखास्त झाला होता. कोणी विचारलं की, मी सांगायचो काही मुंबईबाहेर गेले, काही थकले, काही कामात बिझी झाले. पंचवीस जणांची संख्या जेमतेम दोन-तीन वर आली. आपसूक ग्रुप लयाला गेला. ग्रुपमधले अजित लोणकर, अशोक पानवाला, गिरीश घाणेकर, सुनील मोये, अरविंद गोगटे, नंदू जुकर, अभिजीत देसाई, मामा येडवणकर, राजू गोडबोले देवाघरी गेले. ते स्वर्गातील कट्टय़ावर मैफिल सजवीत असतील अशी मी मनाची समजूत घालत राहिलो. प्रसंगी त्यांच्या आठवणीनं व्याकूळ होत राहिलो. एकेक विकेट पडत होती आणि काहीच विशेष झालं नाही असं मी वरून दाखवत असलो तरी मी आतून हललो होतो. या सगळय़ांच्या शिवाय मी आयुष्य जगत होतो? कट्टय़ाचे अश्रू मला दिसत होते. माधव मनोहर, सी. रामचंद्र, वसंत देशमुख, सुधीर फडके गेले तेव्हा हाच कट्टा हादरलेला मी पाहिला होता. कट्टय़ावरची आमची जागा ठरलेली होती. तिथं सहसा कोणी बसत नसे. कोणी बसलंच तर आम्ही आल्यावर ते घाईघाईत जागा आमच्यासाठी रिकामी करीत. ‘अरे, आमची काय मक्तेदारी आहे का?’ आम्ही हसत हसत म्हणायचो. तेही हसायचे आणि उठायचे. आमच्या गप्पा ऐकायला अनोळखी माणसं आमच्या आसपास बसायची. डॉ. मधू खोटलेकर त्यातलेच एक. हसत हसत ते ग्रुपमध्ये केव्हा मिसळले कळलंच नाही. क्वचित कोणी त्यांना औषध विचारले तरी ते हसत सुटायचे. बरोबर आहे, कट्टा हाच आमच्या सगळय़ांच्या दुखण्यांवरचा इलाज होता. आमच्यातला एक जण (नामे अरविंद साटम) पुण्याला लग्नाला गेला, अक्षता टाकून तो मुंबईला यायला निघाला तेव्हा त्याला थांबवत वऱहाडी म्हणाले, ‘घाई कसली? संध्याकाळचं रिसेप्शन करून जा.’ त्यावर साटम घाईघाईनं म्हणाला, ‘नाही-नाही, संध्याकाळी मीटिंग आहे. निघावं लागेल.’ मीटिंग म्हणजे टाळता न येणारी कट्टय़ावरची मैफिल होती.

आमच्यातील प्रत्येकानं स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. म्हणून त्यातला कोणी एक आला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं व्हायचं. ‘कुठं गेला रे, xxxxx?’ अशी आस्थेनं प्रेमळ पृच्छा व्हायची. तोही आल्यावर सुखावायचा. शिवीपेक्षा आपण हवेहवेसे आहोत ही भावना मोठी होती. एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर असलेले इंजिनीयर अरविंद गोखले कट्टय़ापाशी गाडी लावून खाली उतरायचे तेच शिव्यांची भेंडोळी सोडत. त्यांच्यातील माणूस कट्टय़ावर ग्रुपमध्ये मोकळा व्हायचा.

‘गोगटे, तुम्ही नक्की कोणाला शिव्या देता हो?’ मी एकदा त्यांना हसत हसत विचारले.

‘कोणाला नाही हो. जनरल.’ गोगटे दिलखुलासपणे म्हणाले आणि उरलेल्या शिव्या त्यांनी हासडल्या. मी त्यांना माझ्याकडच्या आणखी काही शेलक्या शिव्या शिकवल्या. त्यांच्या हाताखालच्या स्टाफने ही शिव्यांची शिकवणी पाहिली असती तर त्यांचं काय झालं असतं?

आमच्यातील एक जेमतेम मॅट्रिक असलेला सदस्य एक दिवशी गोगटेंना म्हणाला, ‘तू खरंच इंजिनीयर आहेस की खडीच्या रस्त्यावर झारीतून डांबर घालण्याचं काम केल्यामुळे तू काळा पडलायस?’

सामाजिक समानता शिकण्यासाठी आम्हाला वेगळीकडे जायची गरज नव्हती.

तरणा अभिजीत देसाई अकस्मात गेला आणि कट्टा हादरला. फुलांचे अश्रू झाले. आमचे सगळे विनोद थिजले. आजही एखाद्या सिनेमाचं नाव आठवत नसेल तर त्याला विचारण्यासाठी माझा हात नकळत फोनकडे जातो. वर गेलेल्या जवळच्या माणसांची ओझरती का होईना भेट घेण्यासाठी देव ‘व्हिजिटिंग अवर्स’ची सुविधा का ठेवत नाही? निदान फोनची सुविधा?…

आज सकाळी सुभाष गांगुली गेला. त्यानं आमच्या जीवनात मोगरा फुलवला होता. बहार आणली होती. त्याच्या किश्श्यांमुळे आमच्या रंध्रारध्रांतून निखळ आनंद दुथडय़ा भरून वाहिला होता. खरं किती, खोटं किती याचा फालतू, अवसानघातकी उहापोह आम्ही कधी केला नाही. तुम्हीही करू नका. आनंद घेणं महत्त्वाचं. एकदा गांगुलीला एक महिला दिसली. गांगुली तिच्या मागे चालू लागला. एव्हाना आम्ही कान टवकारले. मग गांगुलीचा बाँब आला – ‘आयला, ती माझी बायकोच होती’ – इति गांगुली.

आपण दिसायला राजबिंडे आहोत याबद्दल गांगुलीच्या मनात यत्किंचितही शंका नव्हती. एकदा एक बाई त्याला म्हणाली, ‘तुम्ही काय राजबिंडे दिसता हो. मी तुम्हाला नेहमी बघते शिवाजी पार्कच्या कट्टय़ावर. तुम्ही अतुल परचुरे व शिरीष कणेकरांच्या मध्ये बसलेले असता.’
‘अरे, गांगुली, तू आमच्यामध्ये बसलेला असतोस म्हणूनच राजबिंडा दिसतोय’, मी म्हणालो. गांगुली गालातल्या गालात हसला. तो जास्तच राजबिंडा दिसायला लागला.

तो लोणावळय़ाला त्याच्या भाचीच्या लग्नाला गेला होता. जेवणाच्या पंक्तीत सगळे त्याच्याकडे वळून वळून बघत होते. तो राजबिंडा असल्यानं त्याला या अटेंशनची सवय होती, पण हे जरा जास्तच होत होतं. अखेर गांगुलीला कळले की, त्याच्या शेजारी धर्मेंद्र बसला होता. (धर्मेंद्रचं लोणावळय़ाला फार्महाऊस होतं ही कहाणी मागणी कहाणी!)

ज्या ‘गांगुली स्पेशल’नं आम्ही सगळे एकरकमी बोल्ड झालो होतो तो आता वाचा. गांगुली रेशनकार्डाचं काम करायला अभिनेत्री डिंपल कपाडियाकडे गेला होता (डिंपल रेशनकार्ड वापरते? मग मुकेश अंबानीही वापरत असेल व मान खाली घालून रेशनच्या तांदळाचा भात खात असेल.) काम झाल्यावर गांगुलीने डिंपलला हाताची पाच बोटं दाखवली. म्हणजे पन्नास रुपये. डिंपलने पाचशे रुपये दिले आणि वर जेवायला बोलावले. कान बधीर झाल्यानं पुढलं आम्ही ऐकू शकलो नाही. पण पुढे बरेच दिवस माझ्या डोळय़ांसमोर राजबिंडा गांगुली मांडी घालून पाटावर बसलाय व डिंपल वाकून वाकून त्याला चवळीची आमटी, मेतकूट वगैरे वाढत्येय हे चित्र येत होतं.

गांगुली गेला. जाताना सोबत आनंदाचा ठेवा घेऊन गेला. आयुष्यातले एकेक आनंद संपत चाललेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या