तिवरे धरणाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – विनायक राऊत

1386

तिवरे धरणाजवळ कोण बेकायदेशीर काम करत असेल. धरण बंद होणार अशा अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी आज गुरुवारी प्रशासनाला दिल्या.

 खासदार विनायक राऊत यांनी तिवरे गावात धरणफुटीतील दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली. सर्वप्रथम त्यांनी तिवरेवासियांच्या पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेतली. सध्या तिवरे दुर्घटनाग्रस्तांना तीन पाणी योजना देण्यात आल्या असून ग्रामस्थांनी सुचविल्याप्रमाणे चौथी पाणी पुरवठा योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या दुर्घटनाग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी बारा पाणी साठवण्याच्या टाक्या देण्यात आल्या असून अजून सहा टाक्यांची मागणीही प्रशासन पुर्ण करेल असे आश्वासन खासदार राऊत यांनी दिले.

माळीणच्या धर्तीवर पुनर्वसन करू

माळीणच्या धर्तीवर तिवरे गावाचे पुनर्वसन करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्याप्रमाणेच आम्ही प्रयत्न करत आहोत. एक आदर्श वसाहत आम्ही उभारू. आपण केलेल्या मागणीप्रमाणे सर्व सोयीसुविधा आम्ही उपल्बध करून देऊ. अल्लोरे येथे उपल्बध असलेल्या शासकीय जागेवर तिवरे धरणफुटीतील दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन होणार आहे. सिध्दीविनायक ट्रस्टने निधी दिला असून लवकरात लवकर घरे उभारण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीची एक महत्वपूर्ण बैठक रत्नागिरीत आयोजित करू असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.

मृत जनावरांच्याबाबतही सर्वेक्षण करून त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 23 व्यक्तींपैकी 20 जणांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली असून उर्वरित तिघांच्या वारसांनाही लवकरच मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणचे तालुकाप्रमुख प्रताप शिंदे,क्षेत्रप्रमुख बाळा कदम,बांधकाम सभापती विनोद झगडे,मंगेश शिंदे,रासपचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार,तहसीलदार जसराज सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सरिता पवार,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आरळेकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

आपली प्रतिक्रिया द्या