
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. तृणमुल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
माजी रेल्वेमंत्री असलेले दिनेश त्रिवेदी हे तीन टर्म राज्यसभेत तृणमूलचे खासदार आहेत. आज अचानक राज्यसभेत बोलताना त्रिवेदी यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार पाहून माझी घुसमट होत आहे. मी त्यावर बोलू शकत नसेल तर येथे (राज्यसभेत) बसण्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा अंतर्मनाचा आवाज ऐकू येतो. आज माझ्या आयुष्यात ती वेळ आली आहे. मी राज्यसभेचा राजीनामा देत आहे असे त्रिवेदी म्हणाले. त्रिवेदी यांनी आपला राजीनामा सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सादर केला. तृणमूल काँग्रेस पक्ष आता ममता बॅनर्जी यांच्या हातात राहीला नाही असे त्रिवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
– भाजपमध्ये जाणार
दिनेश त्रिवेदी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्रिवेदी यांनी राजीनामा देताच काही मिनिटांतच भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी त्रिवेदी यांचे आमच्या पक्षात स्वागतच आहे असे म्हटले.



























































