पंतप्रधान निवासस्थानाचे नाव ‘किंकर्तव्यविमूढ़ मठ’ ठेवा; महुआ मोईत्रा यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजपथाचे नाव केंद्र सरकारकडून बदलण्यात येण्याची चर्चा होत आहे. राजपथाचे नाव कर्तव पथ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राजपथाचे नाव बदलण्यासह पंतप्रधान निवासस्थानाचे नाव बदलून ते ‘किंकर्तव्यविमूढ़ मठ’ असे करण्यात यावे, अशी टीका मोईत्रा यांनी केली आहे.

आपल्याला विश्वास आहे की, ते राजपथाचे नाव कर्तव्य पथ असे करतील, त्याचप्रमाणे पंतप्रधान निवासस्थानाचे नाव बदलून त्यांनी ‘किंकर्तव्यविमूढ़ मठ’ असे करावे. अशी ट्विट मोईत्रा यांनी केले आहे. याआधीही त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला होता. सध्या देशात काय होत आहे? आपली संस्कृती बदलणे, हेच भाजपने कर्तव्य बनवले आहे काय, त्यांचे महापाप आणि वेडेपणामुळे आपला वारसा असलेल्या इतिहास नव्याने लिहिण्यात येणार आहे का, असा सवाल करत त्यांनी भाजपवर तोफ डागली होती.

मोदी सरकारने राजपथाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजपथाचे नाव कर्तव्य पथ असे करण्यात येणार आहे. 7 सप्टेंबरला एनडीएमसीची बैठक होणार आहे. त्यात सरकार या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुलामीच्या प्रत्येक गोष्टीपासून मुक्त होण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता राजपथाचे नाव कर्तव्य पथ करण्यात येणार आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एनडीएमसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. याआधीही सरकारने काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गुलामगिरीचे प्रतीक असलेल्या सर्व गोष्टी बदलण्याचा सरकारचा मानस आहे.