
कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी देशभरात लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस देण्याची प्रक्रिया जोरदार सुरू असली तरी काही ठिकाणी बनावट लसीकरणामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. या बनावट लसीकरणाचं जाळं इतकं विस्तारलं आहे की खुद्द महिला खासदाराला याचा फटका बसला आहे.
या महिला खासदार म्हणजे पश्चिम बंगाल येथील तृणमूल काँग्रेसच्या मिमी चक्रवर्ती आहेत. मिमी यांनी कोलकाता येथे सुरू असलेल्या एका बनावट लसीकरण केंद्रात लस घेतल्याचा दावा केला आहे. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली आहे.

मिमी यांनी कोलकाता येथे बुधवारी कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर शनिवारी त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांच्या घरी डॉक्टरला पाचारण करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र, त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.
त्यांनी सोशल मीडियावरूनही या प्रकाराची माहिती दिली आहे. त्या लसीकरण केंद्रात वापरल्या गेलेल्या लसींच परीक्षण करण्यासाठी त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कोविशिल्ड या लसीचा डोस घेतला होता. मात्र, त्यांना कोविन अॅप्लिकेशनवर तसं कोणतंही नोटिफिकेशन आलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी कोलकाता पोलिसांकडे तक्रार केली आणि या प्रकरणातील आरोपीला अटक झाली, असं चक्रवर्ती यांचं म्हणणं आहे.




























































