
यंत्रमागनगरी अशी ओळख असलेल्या भिवंडीत दोन बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. यात देह विक्री करणारी महिला आणि रशेदुल शेख अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि नारपोली पोलिसांनी ही कारवाई केली असून अजूनही असे असंख्य घुसखोर शहरात असल्याचा संशय पोलिसांना असल्याने यापुढेही सर्च ऑपरेशन राबवण्यात येणार आहे.
हनुमान टेकडी या देह व्यापार करणाऱ्या महिलांच्या वस्तीत खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेस गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने अटक केली. तसेच तिला भाड्याने खोली देणाऱ्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत रशेदुल शेख हा बिगारी काम करणारा बांगलादेशी शहरातील समदनगर या परिसरात राहून काल्हेर येथे काम करीत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे समोर आले. त्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.