जय बजरंग ‘बाहु’बली! कझाकिस्तानच्या पैलवानाला लोळवले, पुनियाने जिंकले कास्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. एकीकडे ऍथलीट नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला असतानाच दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात कास्य पदक जिंकले. बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाजबेकोव डाऊलेट याला 8-0 अशा फरकाने अगदी सहज हरवले आणि कास्य पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी

हिंदुस्थानने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकून ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. 2012 सालातील लंडन ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने सहा पदके जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने सात पदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. मीराबाई चानू (रौप्य, वेटलिफ्टिंग), पी. व्ही. सिंधू (कास्य, बॅडमिंटन), लवलीना बोर्गोहेन (कास्य, बॉक्सिंग) या तीन महिलांसह रवी दहिया (रौप्य, कुस्ती), बजरंग पुनिया (कास्य, कुस्ती), नीरज चोप्रा (सुवर्ण, भालाफेक) या तीन पुरुषांनी आणि पुरुषांच्या हॉकी संघाने (कास्य) टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी पदके जिंकली.

पदक जिंकणारा सहावा कुस्तीपटू

ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्ती या खेळात हिंदुस्थानला पदक जिंकून देणारा बजरंग पुनिया हा सहावा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी खाशाबा जाधव यांनी 1952 साली, सुशील कुमारने 2008 व 2012 साली, योगेश्वर दत्तने 2012 साली, साक्षी मलिकने 2016 साली व रवी दहिया व बजरंग पुनिया यांनी 2021 साली हिंदुस्थानसाठी पदक जिंकले आहे.

सुवर्ण पदकापासून दूरच

हिंदुस्थानच्या कुस्तीपटूंनी ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकली असली तरी अद्याप सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. खाशाबा जाधव यांनी कास्य, सुशील कुमारने एक रौप्य व एक कास्य, योगेश्वर दत्तने कास्य, साक्षी मलिकने कास्य, रवी दहियाने रौप्य व बजरंग पुनियाने कास्य पदक पटकावले आहे.

एकच महिला

हिंदुस्थानने कुस्ती या खेळामध्ये सलग चौथ्यांदा पदक जिंकले आहे. 2008 सालापासून सुरू झालेला हा प्रवास आता 2012, 2016 व 2021पर्यंत सुरू राहिला आहे. पॅरीस ऑलिम्पिकमध्येही पदके जिंकावीत अशी आशा तमाम कुस्तीप्रेमी करीत आहेत. मात्र कुस्ती या खेळात हिंदुस्थानच्या साक्षी मलिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले होते.