
कोरोनाच्या संकटातही जपानने टोकियो ऑलिम्पिकचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार केलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या नियमांसह उद्यापासून ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवास सुरुवात होणार आहे. क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकात फक्त 22 खेळाडू आणि 6 अधिकारी सहभागी होणार आहेत. हिंदुस्थान ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी गुरुवारी ही माहिती दिली. कोरोना महामारीमुळे सर्वच देशांच्या खेळाडूंचे पथक हे कमी संख्येचे असणार आहे. खबरदारी म्हणून उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीला कात्री लावण्यात आली असून या सोहळ्यानंतर ऑलिम्पिकचे बिगूल वाजणार आहे.
आठ खेळांतील खेळाडूंची हजेरी
ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी पथकात एक हॉकीपटू, 8 बॉक्सर, 4 टेबल टेनिसपटू, 2 रोविंगपटू, 1 जिमनास्ट, एक जलतरणपटू, 4 नौकायनपटू आणि तलवारबाजीतील एकमेव खेळाडू यांचा समावेश असणार आहे. 6 अधिकारी या खेळाडूंसोबत ध्वजसंचलनात सहभागी होणार आहेत. म्हणजेच एकूण 28 जणांचे हिंदुस्थानी पथक असणार आहे. तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, भालाफेक, टेनिस, हॉकी व नेमबाजी या खेळांतील खेळाडू उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. कारण या खेळातील स्पर्धा 23 व 24 जुलैला होणार असल्याने खेळाडूंना तयारी पिंवा विश्रांतीची गरज आहे.
दृष्टिक्षेपात…
– ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता, तर हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 4ः30 वाजता सुरू होईल.
– ऑलिम्पिकच्या इतिहासात कोरोनामुळे प्रथमच ही स्पर्धा विषम वर्षात म्हणजे 2021मध्ये आयोजित होत आहे. यापूर्वी सर्व ऑलिम्पिक या सम वर्षात (1896, 1900, 1904, 2016) आयोजित झालेल्या आहेत.
– कोरोनाच्या संकटामुळे पदकविजेते खेळाडू स्वतः आपल्या गळ्यात पदक घालतील.
– कोरोनाच्या महामारीच्या संसर्गामुळे ऑलिम्पिक स्पर्धा प्रथमच प्रेक्षकांविना होत आहे.
– शक्य तेथे खेळाडूंना तसेच संयोजकांना रोबोट्स मदत करताना दिसणार आहेत.
– कराटे, स्पोर्ट्स क्लायबिंग, सर्फिंग आणि स्केट बोर्डिंगचा प्रथमच ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.
– टोकियो ऑलिम्पिकमध्ये 33 खेळांच्या एकूण 339 स्पर्धा होणार आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक संख्येत स्पर्धा होणार आहेत.
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात केवळ एक हजार जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मनप्रीत, मेरी ध्वजवाहक
ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात हिंदुस्थानी हॉकीपटू सहभागी होणार नसले तरी कर्णधार मनप्रीत सिंग हा हिंदुस्थानी पथकाचा ध्वजवाहक असल्याने त्याला यात सहभागी व्हावे लागणार आहे. याचबरोबर सहा वेळची जगज्जेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हीदेखील हिंदुस्थानी पथकाची ध्वजवाहक असणार आहे.
हिंदुस्थानचा 21वा क्रमांक
टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचे ध्वजसंचलन हे जपानी वर्णमालेनुसार होणार आहे. त्यामुळे या ध्वजसंचलनात हिंदुस्थानला 21वा क्रमांक मिळाला आहे. इतर देशांची पथकसंख्या कमीच असणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचे 50, तर ब्रिटनचे 30 खेळाडूंचे पथक उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे.




























































