हिंदुस्थानसह सहा देशांच्या अडचणी वाढणार, ऑलिम्पकला रवाना होण्यापूर्वी सात दिवस करावी लागणार कोरोना टेस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जपानने कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूमुळे एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या देशांत डेल्टा प्लसचे रुग्ण आहेत त्या देशातील खेळाडूंनी ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी सलग सात दिवस कोरोना टेस्ट करावी, अशी अट जपानने घातली आहे. यासाठी त्यांनी एक योजना तयार केली असून लवकर या योजनेची माहिती ते संबंधित देशांना देणार आहेत.

1 जुलैपासून नियम लागू होणार

जपानकडून बनविण्यात येत असलेल्या नवीन नियमामुळे हिंदुस्थान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका व अफगाणिस्तान या देशांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण 1 जुलैनंतर या देशांना आपल्या ऑलिम्पियन खेळाडूंना सलग सात दिवस क्वारंटाईन करून रोज कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.

इतर देशांना 4 दिवसांत 2 टेस्ट

डेल्टा प्लस रुग्ण असलेले सहा देश सोडून इतर देशांतील खेळाडूंनी ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी 4 दिवसांत 2 वेळा कोरोना टेस्ट करायची आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्टबर या कालावधीत टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे.

युगांडाच्या संघात डेल्टाचा रुग्ण

युगांडा संघ टोकियोमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला ‘डेल्टा’ या घातक विषाणूची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे. त्यामुळे जपान सरकार खडबडून जागे झाले. या नव्या विषाणूचा जपानमध्ये झपाटय़ाने फैलाव होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यासाठी जपान सरकाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.