
हिंदुस्थानी खेळाडूंचे पहिले पथक रविवारी जपानची राजधानी टोकियो येथे दाखल झाले. या पथकातील खेळाडूंनी सोमवारपासून सरावाला सुरुवात करीत आपण ‘मिशन ऑलिम्पिक’साठी सज्ज झालो आहोत हे दाखवून दिले. हिंदुस्थानी तिरंदाज, बॅडमिंटनपटू, जिम्नास्ट व टेबलटेनिसपटू यांनी 19 जुलैपासून प्रॅक्टीसचा श्रीगणेशा केला.
तिरंदाजांनी युमेनोशिमा पार्कमध्ये सोडले बाण
हिंदुस्थानचे स्टार तिरंदाज अतानू दास व दीपिका कुमारी यांनी सोमवारी सकाळच्या सत्रात कसून सराव केला. युमेनोशिमा पार्कमध्ये या दोघांनीही तिरंदाजीवर मेहनत घेतली. जी साथीयान व शरथ कमाल या टेबलटेनिसपटूंनीही सरावाकडे गांभीर्याने लक्ष दिले. दोघेही ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील यात शंका नाही.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे कसब आत्मसात करताहेत
हिंदुस्थानची जिम्नास्ट प्रणती नायक हिनेदेखील सोमवारपासून सरावाला सुरुवात केली. लक्ष्मण मनोहर शर्मा या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तिने जिम्नॅस्टीक्स या खेळाचे कसब आत्मसात केले. तसेच पी.व्ही. सिंधू व बी साई प्रणीत या बॅडमिंटनपटूंनी पार्क तेई सँग या एकेरीतील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. चिराग शेट्टी व सात्त्विक रेड्डी या बॅडमिंटनमधील दुहेरीतील जोडीने मथायस बोए यांच्या प्रशिक्षणाखाली खेळातील बारकावे समजून घेतले. हिंदुस्थानच्या 15 नेमबाजांनीही शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत ऑलिम्पिकआधी आत्मविश्वास संपादन केला.
विलगीकरणाचा नियम हटवला अन् सुटकेचा नि:श्वास सोडला
टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीकडून कोरोना अंतर्गत कडक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे. याच कारणामुळे हिंदुस्थानी खेळाडूंना तेथे पोहोचल्यानंतर तीन दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार होते. पण कालांतराने हा नियम आयोजकांकडून हटवण्यात आला. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंनी टोकियो येथे पाऊल ठेवल्यानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगेच सरावाला सुरुवात केली. हिंदुस्थानी खेळाडूंना आता जिम्नॅशियम व डायनिंग हॉलचा वापर करता येत आहे.



























































