हिंदुस्थानी महिला खेळाडूंचा झंझावात; सिंधू, दीपिका, पूजा यांची पुढल्या फेरीत धडक

हिंदुस्थानी खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये अद्याप म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. बुधवारी मात्र हिंदुस्थानी महिला खेळाडूंनी पदक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी व दुखापतीमधून बाहेर येत दमदार पुनरागमन करणारी बॉक्सर पूजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून आगेकूच केली.

उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हिंदुस्थानची दिग्गज बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने बुधवारी आपल्या प्रतिमेला साजेसा खेळ केला. तिने हाँगकाँगच्या चिऊंग एनवाय हिच्यावर 21-9, 21-16 अशा फरकाने अगदी सहज विजय मिळवला आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हिंदुस्थानच्या खेळाडूने ही लढत 36 मिनिटांमध्ये जिंकली. आता पुढील फेरीत पी.व्ही. सिंधूसमोर डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट हिचे आव्हान असणार आहे. पी.व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या खेळाडूला चार वेळा हरवले असून फक्त एकाच लढतीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. थायलंड ओपनमध्ये मिया ब्लिचफेल्ट हिने पी.व्ही. सिंधूला हरवले होते.

पदकापासून एक पाऊल दूर

मेरी कोम, लोवलीना बोर्गोहेन या दोन महिला बॉक्सर्सने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता हिंदुस्थानच्या आणखी एका महिला बॉक्सरने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत आपलीही पदकासाठीची दावेदारी मजबूत केली आहे. पूजा राणीने मिडलवेट प्रकारात (69 ते 75 किलो वजनी गट) अर्जेरियाच्या इचरक चेब हिला 5-0 अशा फरकाने पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पूजा राणी आता पदकापासून एक पाऊल दूर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या